एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधीसाठी गुप्त बोलणी सुरू आहेत, तर दुसरीकडे दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून सुरू असलेल्या या तणावामुळे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे हा करार फिस्कटणार का? आणि मध्य-पूर्वेत पुन्हा युद्धाची ठिणगी पडणार का?

Donald Trump Iran Deal: मध्य-पूर्व पुन्हा एकदा अशा एका धोकादायक वळणावर उभं आहे, जिथे मुत्सद्देगिरीची एक छोटीशी चूक संपूर्ण जगाला एका विनाशकारी युद्धात ढकलू शकते. अमेरिका आणि इराणमध्ये होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली करण्यासाठी आणि ६० दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू आहेत. पण या गुप्त कराराची माहिती बाहेर येताच जागतिक बाजारपेठेत आणि लष्करी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा खरंच शांततेचा प्रयत्न आहे की एका मोठ्या युद्धापूर्वीची शांतता?

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

महाशक्तींचा सीक्रेट गेम: जगाच्या हृदयाचे ठोके का वाढले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टन आणि तेहरानमध्ये एका अत्यंत गोपनीय कराराचा मसुदा तयार झाला आहे. या डीलचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जगाची लाईफलाईन असलेली होर्मुझची सामुद्रधुनी. या प्रस्तावानुसार, अमेरिका आपली नौदल नाकेबंदी कमी करेल आणि इराणच्या तेल निर्यातीवरील कठोर निर्बंध काही प्रमाणात हटवेल. पण या बदल्यात इराणला जे करायचं आहे, त्याने सर्वांचीच झोप उडवली आहे. इराणला फक्त ३० दिवसांच्या आत या समुद्री मार्गावर पेरलेल्या आपल्या घातक सागरी सुरुंग (Naval Mines) काढून टाकाव्या लागतील. याच मार्गावरून संपूर्ण जगाला ऊर्जा पुरवठा होतो. इथे एक जरी चूक झाली, तरी जागतिक अर्थव्यवस्था पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळू शकते.

Scroll to load tweet…

ट्रम्प यांचं गूढ मौन आणि तेहरानचा सस्पेन्स

या संपूर्ण चर्चेतला सगळ्यात मोठा सस्पेन्स म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची भूमिका. व्हाईट हाऊसमधून येणाऱ्या बातम्यांनुसार, ट्रम्प या प्राथमिक करारावर अजिबात खूश नाहीत. २०१५ च्या अणुकरारापेक्षा (JCPOA) जो करार जास्त कठोर आणि आक्रमक नसेल, त्यावर सही करण्याच्या मूडमध्ये ते नाहीत. दुसरीकडे, तेहराननेही आपले पत्ते उघडलेले नाहीत. इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की, जोपर्यंत सर्व निर्बंध पूर्णपणे हटवले जात नाहीत, तोपर्यंत या कागदी करारांना काहीही किंमत नाही. दोन्ही देशांच्या प्रमुखांमधील या तणावामुळे हा करार एका नाजूक वळणावर आला आहे.

कागदावर सह्या, आकाशात हल्ले: शस्त्रसंधीत मिसाइल कोणी डागलं?

सगळ्यात धक्कादायक चित्र जमिनीवर दिसतंय. एकीकडे न्यूयॉर्क आणि जिनिव्हामध्ये शांततेच्या गप्पा सुरू आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने बंदर अब्बासजवळ इराणचे पाच टेहळणी ड्रोन पाडले आहेत. याला जे प्रत्युत्तर मिळालं, त्याने संपूर्ण मध्य-पूर्वेला हादरवून सोडलं.

Scroll to load tweet…

कुवैतच्या आकाशात अचानक सायरन वाजू लागले, कारण तिथे एक बॅलिस्टिक मिसाइल हवेतच नष्ट करण्यात आलं. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने या हल्ल्याची जबाबदारी उघडपणे स्वीकारली. त्यांनी दावा केला की, ज्या अमेरिकी लष्करी तळावरून त्यांचे ड्रोन पाडण्यात आले, त्यालाच त्यांनी लक्ष्य केलं. कुवैतने याला "गुन्हेगारी इराणी कृत्य" म्हटलं आहे, ज्यामुळे या तथाकथित शांतता चर्चेची पार अब्रू गेली आहे.

विनाशाचं काउंटडाऊन: ही वादळापूर्वीची शांतता आहे का?

या रक्तरंजित लपाछपीने हे सिद्ध केलं आहे की दोन्ही महासत्तांमध्ये विश्वासाचं नातं शून्य आहे. होर्मुझची सामुद्रधुनी सध्या अशा एका ज्वालामुखीवर बसली आहे, जिथे कोणत्याही एका सैनिकाचं बोट जरी ट्रिगरवर गेलं, तर ते तिसऱ्या महायुद्धाचं बटण दाबू शकतं. संपूर्ण जगाचं लक्ष आता वॉशिंग्टन आणि तेहरानच्या पुढच्या पावलावर लागलं आहे. ही ६० दिवसांची मुदत खरंच विध्वंस टाळेल, की येणाऱ्या भयंकर वादळाची ही फक्त एक सुरुवात आहे?