आजकाल कार घेताना पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक (EV) असे अनेक पर्याय मिळतात. पेट्रोल कार सुरुवातीला स्वस्त असली तरी नंतरचा खर्च जास्त असतो. तर सीएनजी आणि ईव्ही सुरुवातीला महाग वाटल्या तरी भविष्यात तुमचे पैसे वाचवतात. तुमच्या रोजच्या प्रवासाचा विचार करून योग्य कार निवडा.
तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत आहात? मग तुमच्यासमोर पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक असे अनेक पर्याय येतात. आजकाल ग्राहकांसमोर खूप मोठे ऑप्शन्स आहेत. पूर्वी असं नव्हतं. आता सीएनजी आणि इलेक्ट्रिक गाड्यांनाही मोठी डिमांड आहे.
त्यामुळे कार घेताना फक्त तिची किंमत पाहून चालणार नाही. मग आपण कोणती कार निवडायची? तुम्ही पेट्रोल मॉडेल निवडलं, तर सुरुवातीचा खर्च कमी असतो. पण मायलेजचा विचार केला, तर महिन्याचा किंवा वर्षाचा खर्च जास्त येतो. त्याचप्रमाणे सीएनजी कारची सुरुवातीची किंमत थोडी जास्त असते. पण इंधनाचा खर्च कमी असल्याने दीर्घकाळात तुमचे पैसे वाचतात. इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत चित्र थोडं वेगळं आहे. ईव्हीची सुरुवातीची किंमत जास्त असते. पण घरीच चार्जिंग केल्यामुळे प्रति किलोमीटरचा खर्च खूपच कमी येतो.
पेट्रोल कारचे फायदे
- वापरायला आणि मेंटेन करायला सोपी
- पेट्रोल पंप सगळीकडे सहज उपलब्ध असतात
- इंधन भरण्यासाठी जास्त वेळ लागत नाही
- सुरुवातीची किंमत सीएनजी आणि ईव्हीपेक्षा कमी असते
तोटा: जास्त काळ वापरल्यास पेट्रोलचा खर्च खूप वाढतो. उदाहरणार्थ, सध्याच्या आकडेवारीनुसार नेक्सॉन (Nexon) पेट्रोल कारचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे ७.६९ रुपये येतो. तुम्ही जर दर महिन्याला गाडी जास्त चालवत असाल, तर पाच वर्षांत इंधनाचा खर्च खूप मोठा होतो. अशा वेळी सीएनजी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सीएनजीचा खर्च पेट्रोलपेक्षा कमी असतो.
तिन्ही गाड्या चालवण्याचा खर्च किती?
नेक्सॉन सीएनजी चालवण्याचा खर्च प्रति किलोमीटर सुमारे ५.३० रुपये येऊ शकतो. पेट्रोलच्या तुलनेत यामुळे प्रति किलोमीटर काही रुपयांची बचत होते. जे लोक रोज जास्त प्रवास करतात, त्यांच्यासाठी पाच वर्षांत ही खूप मोठी बचत ठरते. त्यामुळे सीएनजी कार घेण्यापूर्वी तुमच्या भागात सीएनजी पंप आहेत की नाही, हे नक्की तपासा. जर सीएनजी सहज मिळत असेल आणि गाडीचा वापर जास्त असेल, तर याचा नक्कीच फायदा होईल.
ईव्ही: पैसे वाचवण्यासाठी कशी बेस्ट आहे?
- या कारमध्ये पेट्रोल किंवा गॅस (CNG) भरण्याची गरज नाही
- घरीच चार्जिंग करणं शक्य आहे
- १ किलोमीटरसाठी फक्त २.५० रुपये खर्च येऊ शकतो
- पेट्रोल कारच्या तुलनेत ही खूपच स्वस्त पडते
तुम्ही रोज ऑफिसला जात असाल किंवा गाडी जास्त चालवत असाल, तर पेट्रोलवर उडणारा मोठा पैसा तुम्ही वाचवू शकता. यात सामान्य गाड्यांसारखं पेट्रोल इंजिन नसतं, त्यामुळे सर्व्हिसिंगचा खर्चही कमी येतो. ही कार घरी किंवा ऑफिसमध्ये चार्ज केली, तरच फायद्याची ठरते. बाहेर चार्जिंग केल्यास खर्च वाढतो. आणीबाणीच्या वेळी बाहेरचे फास्ट चार्जर वापरले, तर विजेचं बिलही जास्त येऊ शकतं.


