रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० तिच्या रेट्रो लूक आणि आरामदायी राइडसाठी खूप लोकप्रिय आहे. यात १३ लिटरची पेट्रोल टाकी, ३४९ सीसी इंजिन आणि ड्युअल-चॅनल एबीएस आहे, ज्यामुळे लांबच्या प्रवासासाठी ही एक उत्तम बाईक ठरते.
मुंबई : रॉयल एनफ्लिड क्लासिक ३५० ची क्रेझ कधीच कमी होत नाही. तिचा रेट्रो लूक, दमदार आवाज आणि आरामदायी राइड यामुळे ही बाईक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. जर तुम्ही रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० घेण्याचा विचार करत असाल, तर हा एक उत्तम निर्णय ठरू शकतो. या बाईकबद्दल तुम्हाला माहिती असायलाच हवी अशी सर्व माहिती खाली दिली आहे.
किती मायलेज देते?
सर्वांत आधी रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० च्या मायलेजविषयी बोलूया. ही बाईक एका लिटरमध्ये साधारण ३५ किलोमीटरचं मायलेज देते. म्हणजेच, जर तुम्ही १०० रुपयांचं पेट्रोल टाकलं, तर तुम्ही जवळपास ३० किलोमीटरचा प्रवास करू शकता. अर्थात, चालवण्याच्या पद्धतीनुसार हे मायलेज कमी-जास्त होऊ शकतं.
मायलेजमध्ये फरक का पडतो? शहरातील ट्रॅफिक, सतत ब्रेक मारणं, वेगात गाडी चालवणं आणि अचानक वेग वाढवणं या गोष्टींचा मायलेजवर परिणाम होतो. क्लासिक ३५० मध्ये १३ लिटरची मोठी पेट्रोल टाकी दिली आहे, जी लांबच्या प्रवासासाठी खूप फायदेशीर ठरते. टाकी मोठी असल्यामुळे तुम्हाला वारंवार पेट्रोल पंपावर थांबण्याची गरज पडत नाही. ३५ किमी प्रति लिटर मायलेज आणि १३ लिटरची टाकी याचा हिशोब केला, तर फुल टँकमध्ये तुम्ही तब्बल ४५५ किलोमीटरपर्यंतचा प्रवास करू शकता.
रॉयल एनफिल्डमध्ये ३४९ सीसी क्षमतेचं सिंगल-सिलेंडर इंजिन दिलं आहे. हे इंजिन रोजच्या शहरातील प्रवासासाठी आणि हायवेवरील लांबच्या राईडसाठी एकदम परफेक्ट आहे. हे इंजिन २०.२ bhp पॉवर आणि २७ Nm टॉर्क जनरेट करतं. ज्यांना निवांत आणि आरामदायी क्रूझिंगची आवड आहे, त्यांच्यासाठी हे इंजिन खूपच भारी आहे.
चालकाच्या सुरक्षेसाठी क्लासिक ३५० मध्ये ड्युअल-चॅनल एबीएस (ABS) देण्यात आलं आहे. अचानक ब्रेक मारल्यास चाकं लॉक होण्यापासून अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम वाचवते. यामुळे बाईकवर तुमचं नियंत्रण राहतं, जे अचानक ब्रेक मारण्याच्या परिस्थितीत खूप महत्त्वाचं असतं.
जर तुम्हाला बाईकची आवड असेल आणि लांबच्या प्रवासाला जाणं पसंत असेल, तर रॉयल एनफिल्ड क्लासिक हा एक उत्तम पर्याय आहे. लांबच्या राईडनंतर पाठदुखीचा त्रास किंवा वारंवार पेट्रोल संपण्याची चिंता तुम्हाला सतावणार नाही. टूरिंगसाठी उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम बाईक्सपैकी ही नक्कीच एक आहे.


