Father Loses 45 Lakhs in Stock : वडिलांनी आयुष्यभराची कमाई, म्हणजे तब्बल ७५ लाख रुपये, एकाच स्टॉकवर लावले. आता त्या गुंतवणुकीची किंमत फक्त ३० लाख उरली आहे. हे ४५ लाखांचं मोठं नुकसान कसं भरून काढायचं, यासाठी मुलाने सोशल मीडियावर मदत मागितली आहे. या घटनेमुळे आर्थिक साक्षरतेवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई : आपल्या वडिलांनी आयुष्यभराची सगळी कमाई एकाच शेअरमध्ये गुंतवली आणि त्यात मोठं नुकसान झालं, हे सांगत एका मुलाने सोशल मीडियावर मदतीसाठी पोस्ट केली आहे. वडिलांनी मोठ्या कष्टाने जमवलेले ७५ लाख रुपये एकाच स्टॉकमध्ये गुंतवले होते, ज्याची किंमत आता फक्त ३० लाख रुपये उरली आहे. यानंतर सोशल मीडियावर ही गोष्ट चर्चेचा विषय बनली आहे.
मुलाने सांगितले की, एका नातेवाईकाच्या सांगण्यावरून त्याच्या वडिलांनी २०१३ मध्ये या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. शेअर बाजाराबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे, त्यांनी आपली सगळी बचत वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवण्याऐवजी एकाच शेअरमध्ये पुन्हा-पुन्हा गुंतवली.
तीन डिमॅट अकाऊंट, पण शेअर एकच
मुलाने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या वडिलांनी २०१३ ते २०२० या काळात तीन वेगवेगळ्या डिमॅट अकाऊंटमधून एकाच कंपनीच्या शेअरमध्ये पैसे गुंतवले.
- आईचं अकाऊंट : जवळपास ३० लाख रुपये
- वडिलांचं अकाऊंट : जवळपास २५ लाख रुपये
- मामाचं अकाऊंट : जवळपास २० लाख रुपये
कुटुंबाची सगळी बचत गमावल्यामुळे वडील खूप निराश झाले आहेत आणि आता तरी हुशारीने निर्णय घ्यायचा आहे, असं मुलाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. "आमच्याकडून मोठी चूक झाली हे आता कळतंय. त्यामुळे सहानुभूती किंवा उपदेशाऐवजी, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अनुभवी लोकांकडून ठोस सल्ला हवा आहे," असं त्याने स्पष्ट केलं.
गुंतवणूकदारांमध्ये वेगवेगळी मतं
मुलाची ही पोस्ट व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावरील गुंतवणूकदारांमध्ये दोन गट पडले. एका गटाचं म्हणणं आहे की, अजून नुकसान होण्याआधी उरलेले ३० लाख रुपये काढून घ्यावेत आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवावेत. एका युजरने लिहिले, "पैसे शून्य होण्यापेक्षा हातात ३० लाख असणं कधीही चांगलं."
तर दुसऱ्या गटाचं मत आहे की, जर कंपनीवर कोणतीही कायदेशीर कारवाई सुरू नसेल, तर शेअरची किंमत हळूहळू वाढू शकते, त्यामुळे विकण्याची घाई करू नये. एका गुंतवणूकदाराने एक महत्त्वाचा सल्ला दिला, "गेलेल्या ७५ लाखांचा विचार सोडा. आज तुमच्याकडे ३० लाख रुपये असते, तर तुम्ही ते याच कंपनीत गुंतवले असते का? याचं उत्तर 'नाही' असेल, तर लगेच पैसे काढून घ्या आणि भांडवल वाचवण्याला प्राधान्य द्या." या घटनेमुळे सोशल मीडियावर आर्थिक साक्षरतेबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे.


