भगवान शंकरांनी रागाच्या भरात गणपतीचं मूळ मस्तक उडवलं होतं, पण ते मस्तक नेमकं गेलं कुठे? शिवपुराणानुसार हे मस्तक उत्तराखंडच्या पाताळ भुवनेश्वर गुहेत आहे. याशिवाय ते गंगेत वाहून गेलं किंवा शिवलिंगात विलीन झालं, अशाही अनेक आख्यायिका आहेत.

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धूम आहे. हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजेचा मान आहे. गणपतीला हत्तीचं डोकं कसं लागलं, ही गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पार्वती माता स्नानाला जाताना तिने गणपतीला पहारेकरी म्हणून उभं केलं होतं. कुणालाही आत सोडू नकोस, अशी सक्त ताकीद तिने दिली होती. त्याच वेळी तिथे भगवान शंकर आले. गणपतीने त्यांना ओळखलं नाही आणि आत जाण्यापासून रोखलं. यामुळे शंकरांना राग आला आणि त्यांनी रागाच्या भरात गणपतीचं मस्तक उडवलं.

नंतर जेव्हा पार्वती तिथे आली आणि तिने टाहो फोडला, तेव्हा शंकरांचा राग शांत झाला. त्यांनी आपल्या गणांना पाठवून जो प्राणी सर्वात आधी दिसेल त्याचं डोकं आणायला सांगितलं. गणांना सर्वात आधी हत्ती दिसला. त्यांनी हत्तीचं डोकं आणलं आणि ते गणपतीच्या धडावर जोडलं. शंकरांनी त्यात प्राण फुंकले आणि अशा प्रकारे गणपती 'गजानन' झाला.

शिवपुराण काय सांगतं?

पण मग गणपतीचं ते मूळ मस्तक गेलं कुठे? हा प्रश्न अनेकांना पडतो. शिवपुराणात याचं उत्तर मिळतं. शंकरांनी इतक्या जोरात वार केला होता की ते मस्तक थेट एका गुहेत जाऊन पडलं. ही गुहा उत्तराखंड राज्यामध्ये पिथोरागढ जिल्ह्यात आहे. या गुहेचं नाव 'पाताळ भुवनेश्वर' (Patal Bhuvaneshwar) असं आहे. आजही या गुहेत गणपतीच्या त्या मूळ मस्तकाची पूजा केली जाते. याला 'आदी गणेश' असं म्हणतात. या मस्तकावर १०८ पाकळ्यांचं एक दिव्य कमळ आहे, ज्यातून सतत पाणी टपकत असतं. या गुहेत चार दगड आहेत, जे चार युगांचं प्रतीक मानले जातात. यातला चौथा दगड कलियुगाचा आहे. ज्या दिवशी हा चौथा दगड गुहेच्या भिंतीला स्पर्श करेल, त्या दिवशी कलियुगाचा अंत होईल, अशी इथली आख्यायिका आहे.

इतर काही मान्यता

काही कथांनुसार, शंकरांनी त्रिशूळाने वार केल्यानंतर ते मस्तक गंगेत पडलं आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर कायमचं वाहून गेलं. तर दुसऱ्या एका मान्यतेनुसार, देवांनी ते मस्तक स्वर्गात नेलं आणि तिथे सुरक्षित ठेवलं. काही तंत्र ग्रंथांमध्ये असाही उल्लेख आहे की, गणपतीचं ते मस्तक एका दैवी शक्तीत रूपांतरित झालं आणि शिवलिंगात विलीन झालं. म्हणूनच शिवलिंगाच्या पूजेआधी गणपतीची पूजा केली जाते, कारण त्याचं मूळ मस्तक शंकराच्या शक्तीत सामावलं आहे. यातलं नेमकं सत्य काय, हे कुणालाच ठाऊक नाही. पण भाविक आजही या सर्व आख्यायिकांवर मनापासून विश्वास ठेवतात.