सॅमसंगने आपला नवीन 'गॅलेक्सी S26 FE' स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये दमदार कॅमेरा, गॅलेक्सी AI फीचर्स आणि Exynos 2500 प्रोसेसर दिलाय. ७९,९९९ रुपये किंमत असलेल्या या फोनवर कंपनी ७ वर्षांचे सॉफ्टवेअर अपडेट्स देणार आहे.

मुंबई : सॅमसंगने गॅलेक्सी S26 सिरीजमध्ये आणखी एक नवीन मॉडेल आणलंय. कंपनीने 'गॅलेक्सी S26 FE' भारतात लाँच केलाय. प्रीमियम फोन्सचे खास फीचर्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, हा या FE मॉडेलचा उद्देश आहे. उत्तम कॅमेरा, गॅलेक्सी AI फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी दमदार परफॉर्मन्स ही या फोनची खासियत आहे. फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला ६.७ इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले, Exynos 2500 प्रोसेसर आणि ४,९०० mAh ची बॅटरी मिळते.

गॅलेक्सी S26 FE ची किंमत

भारतात ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत ७९,९९९ रुपये ठेवली आहे. हा फोन पिस्ताशिओ, ब्लूबेरी आणि ग्रॅफाइट या तीन रंगांमध्ये मिळेल. नवीन फोन घेणाऱ्यांसाठी सॅमसंगने काही भन्नाट ऑफर्सही दिल्या आहेत. जुना फोन एक्सचेंज केल्यास ८,००० रुपयांपर्यंत अपग्रेड बोनस मिळेल. निवडक फायनान्स कंपन्यांसोबत ३० महिन्यांपर्यंतची नो-कॉस्ट EMI सुविधा उपलब्ध आहे, ज्यावर ३,००० रुपयांचा अतिरिक्त अपग्रेड बोनसही मिळेल. प्रमुख बँकांच्या कार्डवर ७,००० रुपयांपर्यंत कॅशबॅक किंवा १२ महिन्यांचा नो-कॉस्ट EMI पर्याय निवडता येईल.

६.७ इंचाचा AMOLED डिस्प्ले

गॅलेक्सी S26 FE मध्ये ६.७ इंचाचा फुल HD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दिलाय. १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेल्या या स्क्रीनला १,९०० निट्सचा पीक ब्राइटनेस मिळतो. फोनला ताकद देण्यासाठी यात Exynos 2500 प्रोसेसर वापरलाय. तसंच, पॉवरसाठी ४,९०० mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली आहे.

ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप

कॅमेऱ्याच्या बाबतीत या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा, १२ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि ३x ऑप्टिकल झूम सपोर्ट असलेला ८ मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा दिलाय. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळतो.

गॅलेक्सी AI सोबत नवं सॉफ्टवेअर

हा फोन अँड्रॉइड १७ वर आधारित One UI 9 वर चालतो. रोजचं काम सोपं करणारे गॅलेक्सी AI फीचर्स हे या नव्या सॉफ्टवेअरचं मुख्य आकर्षण आहे. यातलं 'नाऊ ब्रीफ' (Now Brief) फीचर युजरला हवी ती माहिती त्यांच्या सोयीनुसार देतं. यातून कस्टमाइझ करता येणारे ब्रीफिंग कार्ड्स, हवामानाची माहिती आणि हेल्थ अपडेट्स मिळतात. सोप्या कमांड्स देऊन युजर्स स्वतःचे कार्ड्सही बनवू शकतात. थर्ड-पार्टी ॲप्स आणि नोटिफिकेशन्समध्येही हे फीचर वेळेनुसार योग्य सल्ले देतं.

४५ वॅट फास्ट चार्जिंग

फोनमध्ये ३ नॅनोमीटर तंत्रज्ञानावर बनलेला Exynos 2500 प्रोसेसर आहे. यात 5G, LTE, Wi-Fi 6E, वाय-फाय डायरेक्ट आणि ब्लूटूथ ५.४ चा सपोर्ट मिळतो. ४,९०० mAh ची बॅटरी ४५ वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ४५ वॅटचा अडॅप्टर वापरल्यास अवघ्या ३० मिनिटांत बॅटरी ६९ टक्क्यांपर्यंत चार्ज होते, असा कंपनीचा दावा आहे. याशिवाय १५ वॅट फास्ट वायरलेस चार्जिंग आणि वायरलेस पॉवर शेअरची सुविधाही फोनमध्ये आहे.

IP68 रेटिंग आणि ७ वर्षांचे अपडेट्स

१६१.६ x ७६.९ x ७.४ मिलीमीटर आकार असलेल्या या फोनचं वजन १९३ ग्रॅम आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी याला IP68 रेटिंग मिळालंय. सॅमसंगने या फोनसाठी दीर्घकाळ सॉफ्टवेअर सपोर्ट देण्याचं प्रॉमिस केलंय. ग्लोबल मार्केटमध्ये लाँच झाल्यापासून या फोनला सलग ७ वर्षे ऑपरेटिंग सिस्टीम (OS) अपग्रेड्स आणि ७ वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतील, असं कंपनीने स्पष्ट केलंय.