सार

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याला अखेर यश मिळाले आहे. सरकारने नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Maratha Reservation : मनोज जरांगेंनी शुक्रवारी (26 जानेवारी) नवी मुंबईत घेतलेल्या सभेनंतर सरकारपुढे काही मागण्या ठेवल्या होत्या. अशातच मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मनोज जरांगेंकडे अध्यादेश सुपूर्द केला आहे. यामुळे मराठा समाजात मोठ्या आनंदाचे वातावरण आहे. 

वाशीतील शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर आणि मंत्री गिरीश महाजन उपस्थितीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगेंनी उपोषण सोडले आहे. याशिवाय एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना विजयाचा गुलाल लावल्याचेही दिसून आले. 

मनोज जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य
मनोज जरांगेंनी वाशीत जाहीर सभा घेत सरकारला आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी अल्टीमेटम दिला होता. यासंदर्भात मध्यरात्री तीन तास चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगेंच्या सर्व मागण्यांबद्दल सुधारित अध्यादेश जारी करण्यात आला. आता सुधारित अध्यादेश मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंकडे दिला आहे. 

मनोज जरांगेंची विजयी सभा 

गेल्या साडे चार वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांना आज यश आल्याचे मनोज जरांगेंनी विजयी सभेत म्हटले आहे. सगेसोऱ्यांसाठी काढलेल्या अध्यादेशामुळे मुख्यमंत्र्यांचे मनोज जरांगेंनी आभार मानले आहेत. नोंदी सापडलेल्यांना लवकरच कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मला माझ्या समाजाचा आणि जातीचा अभिमान असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे. 

वाशीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? 
मराठा समाजासाठी न्याय मागणाऱ्या मनोज जरांगेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. जरांगेंच्या नेतृत्वात शांततेत, संयमाने आंदोलन यशस्वी केल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मनोज जरांगेचे तुमच्यावर असलेले प्रेम या ठिकाणी पाहायला मिळाल्याचे एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला उद्देशून म्हटले. ‘दिलेला शब्द पाळणे हिच माझी कार्यपद्धती’ असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मराठा समाजासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आम्ही मतासाठी नव्हे हितासाठी निर्णय घेतले. आजचा दिवस गुलाल उधळण्याचा आहे. 

मनोज जरांगेंनी जाहीर सभेत काय म्हटले होते?
54 लाख नोंदी मराठ्यांच्या (कुणबी) सापडल्याचे जरांगेंनी म्हटले. याशिवाय एका नोंदींवर पाच जणांना आरक्षण मिळणार आहे. आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी अर्ज करा. आतापर्यंत 37 लाख जणांचा प्रमाणपत्र देण्यात आले आहे. पण 37 लाख प्रमाणपत्र कोणाल दिले याचा डेटा जरांगेंनी सरकाकडे मागितला होता. इतरांना का दिले नाही? असा सवालही जरांगेंनी सभेदरम्यान उपस्थितीत केला होता. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागणार आहे. अन्यथा प्रमाणपत्र मिळणार नसल्याचे जरांगेंनी म्हटले होते.

याशिवाय सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या असल्या तरीही त्यासंबंधित शासन निर्णय काढावा असेही जरांगेंनी सभेवेळी म्हटले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचेही जरांगेंनी जाहीर सभेत म्हटले होते.

आणखी वाचा : 

Manoj Jarange : शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला मोफत शिक्षण मिळावे, वाचा मनोज जरांगेंच्या जाहीर सभेतील महत्त्वाचे मुद्दे

Gokhale Bridge : अंधेरीला पूर्व-पश्चिम दिशेला जोडणारा गोखले पुलाचा एक भाग 25 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न, अमीत साटम यांची माहिती

मुंबई पोलिसांच्या 28 जानेवारीपर्यंतच्या सर्व सुट्ट्या या कारणास्तव रद्द