Mumbai Crime : मुंबईत टिंडर डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून पैसे उकळण्याचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. साकीनाका आणि पवई पोलिसांनी संयुक्त कारवाई करत घाटकोपर परिसरातील एका कॅफे क्लबवर छापा टाकला. या प्रकरणी तीन तरुणींसह एकूण 10 जणांना अटक करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Mumbai Crime : मुंबईत डेटिंग अॅपच्या माध्यमातून तरुणांना फसवण्याचे मोठे रॅकेट उघड झाले आहे. टिंडर या डेटिंग अॅपवरून तरुणींनी श्रीमंत पुरुषांना लक्ष्य करून त्यांना भेटीसाठी बोलावले जात होते. त्यानंतर त्यांना कॅफेमध्ये नेऊन धमकावत मोठ्या रकमेची उकळपट्टी केली जात होती. या प्रकरणाचा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांच्या साकीनाका आणि पवई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
टिंडरवरून तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रकार
पोलिसांच्या माहितीनुसार, काही तरुणी टिंडर अॅपवर श्रीमंत तरुणांना लक्ष्य करत होत्या. त्या त्यांना ‘लाईक’ देऊन मैत्री करायच्या आणि नंतर डेटसाठी बोलवायच्या. भेटीसाठी त्या तरुणांना घाटकोपर-साकीनाका परिसरातील एका कॅफे क्लबमध्ये घेऊन जात असत. या रॅकेटसाठी खास दिल्लीहून 25 ते 30 मुलींना मुंबईत आणण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
कॅफेमध्ये धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रकार
कॅफेमध्ये गेल्यानंतर या तरुणी संबंधित तरुणांना खोट्या तक्रारीची धमकी देत असत. “तुझ्यावर लैंगिक अत्याचाराची तक्रार करणार” किंवा “पोलिसांकडे जाईन” अशा धमक्या देऊन त्यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी केली जात होती. अनेक वेळा कॅफेमध्ये महागड्या ऑर्डर देऊन त्याचे अव्वाच्या सव्वा बिल तयार केले जात असे.
कॅफे मालकही रॅकेटमध्ये सहभागी
या प्रकरणात कॅफेचा मालकही या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे. कॅफेमध्ये 25 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत बिल तयार केले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत एकूण 10 जणांना अटक केली असून त्यामध्ये तीन तरुणींचाही समावेश आहे.
छाप्यात समोर आले धक्कादायक वास्तव
पोलिसांनी कॅफेवर छापा टाकला तेव्हा एका तरुणाला खाली बसवून बाऊन्सर्सकडून धमकावत त्याच्याकडून पैसे वसूल केले जात असल्याचे आढळले. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. या रॅकेटमागील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.


