Uddhav Thackeray Speech Today : शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यामध्ये आमच एकत्रित असणे आता महत्वाचे असणार आहे असे विधान केलेच. पण विरोधकांवरही भाषणातून जोरदार टीका केली आहे. 

मुंबई : मुंबईतील वरळी डोममध्ये पार पडलेल्या 'मराठी विजय मेळावा'त शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत जोरदार भाषण करत भाजपवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला. हिंदी सक्तीविरोधातील एकत्र येण्याचा निर्णायक क्षण या सभेमध्ये दिसून आला.

"राज-उद्धव एकत्र" 

उद्धव ठाकेरेंनी भाषणावेळी म्हटले "बऱ्याच वर्षांनंतर राज आणि माझी व्यासपीठावर भेट झाली. ‘सन्माननीय राज ठाकरे’ असा मी उल्लेख करतो. आज आमचं भाषण नाही, तर आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले."आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. आम्ही एकत्र आलो आहोत, आणि राहणार आहोत," असा निर्णायक संदेश देत त्यांनी एकतेचा निर्धार व्यक्त केला.

“कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत”

“आम्ही वापरायचं आणि फेकून द्यायचं असं तुमचं काम नाही सहन करणार. आता आम्ही दोघं तुम्हाला फेकून देणार आहोत.बाळासाहेबांचा आशीर्वाद नसता, तर कुठे असता तुम्ही?”"कधी म्हणतात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. पण लक्षात ठेवा, आम्ही कडवट देशाभिमानी मराठी हिंदू आहोत," असं त्यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर कडवट टीका

उद्धव ठाकरे यांनी भाषणात पुढे म्हटले की. "मराठी माणूस न्याय मागतोय, आणि तुम्ही त्याला गुंड म्हणता? तर आम्ही गुंड आहोत!मला फडणवीसांचं वक्तव्य ऐकून सका पाटलांची आठवण आली,"“काश्मीरमध्ये 370 कलम काढताना पाठिंबा दिला, पण आज महाराष्ट्रात मराठीसाठी आवाज उठवताना तुम्ही आम्हाला विघातक म्हणता?”"तुम्ही आमच्यात गद्दारी करवली, आमचं सरकार पाडलं. तुमचे मालक गुजरातमध्ये बसले आहेत. दोन व्यापाऱ्यांसाठी तुम्ही महाराष्ट्र विकण्याचं काम करता आहात," असा घणाघात त्यांनी भाजपवर केला.

 

Scroll to load tweet…

 

मराठी विजयाची सुरुवात

हिंदी सक्तीच्या विरोधात राज-उद्धव यांची एकत्र येण्याची भूमिका मराठी अस्मितेसाठी टर्निंग पॉइंट ठरत आहे. "मराठी माणसाला आवाज द्यायचाच आहे, आणि त्यासाठी आता आम्ही एकत्र आलोय," असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.