मराठी भाषिक समाजात संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई - "मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा" असे थेट वक्तव्य करणारे शेअर बाजार विश्लेषक सुशील केडिया सध्या मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी एक्स (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टॅग करत मराठी न शिकण्याचा ठाम इशारा दिला होता. यानंतर मराठी भाषिक समाजात संतापाची लाट उसळली असून, सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज सकाळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महत्त्वाच्या मेळाव्यापूर्वीच ही खळबळजनक घटना घडली. सुशील केडिया यांचे कार्यालय तोडण्यात आले असून, यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. "मराठीचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे" अशा आशयाच्या पोस्ट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
सुशील केडिया कोण आहेत?
सुशील केडिया हे शेअर मार्केटशी निगडीत एक प्रसिद्ध आणि अनुभवी गुंतवणूकदार आहेत. 'केडियोनॉमिक्स' या आर्थिक सल्लागार कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून त्यांची ओळख आहे. ही कंपनी सेबी (SEBI) नोंदणीकृत असून, ट्रेडिंग व गुंतवणूक सल्ला देणारी संस्था म्हणून काम करते.
केडिया यांना शेअर बाजारात तब्बल २५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकांमध्ये तसेच दोन प्रमुख हेज फंडांमध्ये कार्य केले आहे. त्यांच्या नावावर सध्या ४५ कंपन्यांमध्ये गुंतवणूक असून, ३० जून २०२५ पर्यंत त्यांचा एकूण शेअरमूल्य सुमारे ३,१०३ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समजते.
भाषेचा अभिमान की द्वेषाचे राजकारण?
सुशील केडिया यांनी केलेले वक्तव्य फक्त भाषेसंबंधी नसून, मराठी अस्मितेवर केलेला थेट प्रहार असल्याचे अनेक नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांचे मत आहे. महाराष्ट्रात राहून मराठी न शिकण्याचा गर्वाने उच्चार करणाऱ्यांबाबत जनतेमध्ये नाराजी आहे. राजकीय वर्तुळातही या मुद्द्याला जोर धरू लागला आहे.
मनसे आणि शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) संयुक्त मेळावा हा मराठी अस्मिता आणि भाषेच्या सन्मानासाठी आयोजित करण्यात आलेला असतानाच ही घटना घडल्यामुळे, यामागे काही संगनमत आहे का, असा प्रश्नही उपस्थित होतो आहे.
पुढे काय?
मुंबई पोलिसांकडून या घटनेची अधिकृत चौकशी सुरू झाली असून, केडिया यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याचा तपास गंभीरपणे घेतला जात आहे. सोशल मीडियावर यासंबंधी अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण केडियांचे समर्थन करत आहेत, तर अनेक जण त्यांच्या वक्तव्यावर संतप्त आहेत.
या संपूर्ण घटनेमुळे महाराष्ट्रात मराठी भाषा, अस्मिता, सामाजिक जबाबदारी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांवर पुन्हा एकदा चर्चेचे वादळ उठले आहे.