Weather Update : मुंबई, ठाणे आणि घाटमाथ्यावरील सध्याचे वातावरण कसे असेल याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गाला पुढील चार ते पाच दिवस पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Mumbai : मुंबई, ठाणे आणि पालघर या पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. हवामान विभागाने या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे या भागांतील नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार असला तरी हवामान अजूनही अनिश्चित आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्गाला अतिवृष्टीचा धोका:
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये २७ ते ३० जून दरम्यान मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागांसाठी धोक्याचा इशारा दिला असून वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.
घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा:
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहरात पुढील चार दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. मात्र, पुणे घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे धोक्याची सूचना देण्यात आली आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यातील घाट परिसरात देखील मुसळधार अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित भागांत मात्र मध्यम ते कमी पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील स्थिती
बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धारशिव जिल्ह्यांमध्ये पाऊस पुढील चार दिवस विश्रांती घेणार आहे. केवळ काही भागात एक-दोन वेळेस हलक्याशा सरी कोसळण्याची शक्यता आहे. जरी मान्सून दाखल झाला असला, तरी अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी या भागांत पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.
विदर्भात हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा:
विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने २६ ते २९ जूनदरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या भागांमध्ये दररोज ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मेघगर्जनेसह हलक्यापासून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. विशेषतः शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी आणि आवश्यक ती उपाययोजना करावी.
भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागांमध्ये अधिक तीव्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. परिणामी, या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून संभाव्य पूर परिस्थिती किंवा वीज पडण्याच्या घटनांना तोंड देण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.
संपूर्ण महाराष्ट्रात हवामान विभागाने विभागनिहाय वेगवेगळे अंदाज जाहीर केले आहेत. काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा आहे, तर काही भागांत पावसाची विश्रांती. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेती करत असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी हवामानाच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


