Monsoon Update : कोल्हापूर आणि पंढरपुर येथील नद्या दुतडीभरुन वाहू लागल्या आहेत. याशिवाय राज्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी भींती कोसळल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. 

Mumbai : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. यामुळे काही ठिकाणी पाणी साचल्यासह नद्यांना पुर आल्याची स्थिती दिसून येत आहे. याशिवाय गावातील विहीरी, नद्याही भरून आले आहेत. अशातच आता पावसामुळे पंढरपूरमधील चंद्रभागा नदी आणि कोल्हापुरातील पंचगंगा नदीला पूर आला आहे. पंढरपूर शहरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असून, जुना दगडी पूल पूर्णतः पाण्याखाली गेला आहे.

उजनी आणि वीर धरणांतून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग

पश्चिम महाराष्ट्रातील उजनी आणि वीर धरणांतील पाण्याचा विसर्ग सुरू असून, त्यामुळे निरा नरसिंहपूर येथून भीमा नदीत तब्बल ६३ हजार क्युसेक विसर्ग होत आहे. हे पाणी आता चंद्रभागा नदीपात्रात पोहोचत असल्यामुळे नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिरे पाण्याखाली

चंद्रभागा नदीच्या वाळवंटात असलेले पुंडलिक मंदिर व इतर लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. वीर आणि उजनी धरणांची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वीर धरणातून नीरा नदीत व उजनी धरणातून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

कोल्हापूरमधील राधानगरी धरणातून दर सेकंदाला ३१०० क्युसेक, वारणातून १३,७७४ क्युसेक, आणि दूधगंगा नदीतून १४,१८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीची पातळी ३४ फूटांवर पोहोचली आहे, जी लवकरच इशारा पातळी (३९ फूट) गाठण्याच्या मार्गावर आहे. यामुळे कोल्हापूरकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

सातारा-सांगली जिल्ह्यांत संततधार पाऊस

सातारा जिल्ह्यातील कोयना धरण ४० टक्के भरले आहे, तर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात सततच्या पावसामुळे काही घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना समोर आल्या असून, दोन जण जखमी झाले आहेत.

विदर्भातील प्रकल्प कोरडे, जोरदार पावसाची प्रतीक्षा

बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प पूर्णपणे कोरडा आहे, तर अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात फक्त १२% जलसाठा शिल्लक आहे. विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाने काहीसा दिलासा मिळालेला असला तरी एकूण जलसाठा केवळ ३० टक्केच आहे.

मराठवाड्यातही स्थिती गंभीर

मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ ३२ टक्के जलसाठा असून, या भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरण्या खोळंबलेल्या शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची वाट पाहावी लागते आहे.राज्यात पावसाचा जोर काही भागांत वाढलेला असताना, विदर्भ आणि मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पावसाचा अभाव आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासन सतर्क असून धरणांमधून नियंत्रित पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे. 

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.