Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवस अधिक धोक्याचे असतील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई: राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. परिणामी, अनेक भागांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील काही दिवस राज्यासाठी अधिक धोक्याचे ठरू शकतात, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई प्रादेशिक केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर २५ ते २९ जून दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या भागासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
कोकणातही पावसाचा तडाखा
कोकणात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यासाठी २५ ते २८ जूनदरम्यान ‘यलो अलर्ट’ आणि २९ जून रोजी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी २७ ते २९ जूनदरम्यान ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
तसेच रत्नागिरीसाठी २५-२६ जून दरम्यान ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
२७ ते २९ जून या कालावधीत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात काय स्थिती?
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पुढील ४ ते ५ दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भात जोरदार वाऱ्यांसह वीजांचा कडकडाट
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.
सावधगिरी बाळगा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा
राज्यभरातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी ओल्या वस्त्रांपासून, विजेपासून दूर राहण्याचा, तसेच नद्या, ओढ्यांपासून सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


