विदर्भात पावासाचा जोर वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. याशिवाय हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

Maharashtra Rains Update : राज्यात कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात सुरुवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात पावसाची सुरुवात उशिरा झाली. गुरुवारपासून मात्र या भागांमध्येही पावसाचा जोर वाढला आहे. विशेषतः वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि बुलढाणा जिल्ह्यांत दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याचे चित्र आहे. अनेक भागांत नद्या, नाले भरून वाहू लागले असून, काही गावांचा संपर्कही तुटला आहे.

नाशिक दिंडोरीत मुसळधार पाऊस

नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरण सध्या ८०% क्षमतेने भरले आहे. त्यामुळे 14 पैकी 7 दरवाजे एक फूट उचलून कादवा नदी पात्रात 5754 क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 पैनगंगा नदीला पूर

वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात गुरुवारी दिवसभर पडलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून, सोयाबीन, हळद, संत्रा, आंबा यांसारखी पिके पाण्याखाली गेली आहेत.वाशिमच्या रिसोड तालुक्यात हजारो हेक्टर शेती खरडून गेली असून, ड्रीप सिंचन यंत्रणा वाहून गेली आहे. अनेक रस्ते बंद झाले असून गावांचा संपर्क तुटलेला आहे.

टी गावात रात्रभर जीव मुठीत

बुलढाण्यातील मेहकर व लोणार तालुक्यात काल प्रचंड पाऊस झाला. मेहकर तालुक्यातील उटी गाव नाल्याच्या पाण्याच्या वेढ्यात सापडले. अनेक घरे पाण्याखाली गेली आणि नागरिकांनी जीव मुठीत धरून रात्र काढली. पेरणीनंतरची शेती पूर्णतः नष्ट झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

हिंगोलीतही शेतीत पाणी, जनजीवन विस्कळीत

हिंगोली जिल्ह्यातही पैनगंगा नदीच्या पुराचा फटका बसला असून, सोयाबीन व हळद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संपूर्ण विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि जनजीवन दोन्ही विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली असून, प्रशासनाने मदत कार्य सुरू केले आहे.

 हवामान खात्याकडून ऑरेंज आणि येलो अलर्ट

आज रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, भंडारा याठिकाणीही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडण्याची शक्यता असून, येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.