राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. आज कोकण, घाटमाथा आणि काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे. पण पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

रायगडला ऑरेंज अलर्ट

कोकणातील रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे आणि मुंबई येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. 

घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रावरही पावसाचा प्रभाव

नाशिक घाटमाथा, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. रायगडप्रमाणेच पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. तर नाशिक घाटमाथा, सातारा आणि कोल्हापूर येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूरमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची हजेरी

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला गेला आहे.