पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७६ वर्षांचे झाले आहेत. भाजपने त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्याची तयारी केली आहे. देशभरात दीपप्रज्वलन आणि रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचं आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आलंय. मोदींचं जन्मगाव वडनगर ते वाराणसी अशी एक मोठी बाईक रॅलीही काढण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७६ वर्षांचे झाले आहेत. देशातील सर्वात लोकप्रिय नेता म्हणून मोदींनी आजही पक्ष आणि सरकारवर आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. सत्तेत २५ वर्षे पूर्ण करत असताना, तरुणांच्या आंदोलनामुळे बदललेलं राष्ट्रीय राजकारण हे मोदींसमोरचं सध्याचं मोठं आव्हान आहे. आज मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात घराघरात दिवे लावण्याचं आवाहन भाजपने केलंय.
गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील वडनगरमध्ये १७ सप्टेंबर १९५० रोजी नरेंद्र दामोदरदास मोदी यांचा जन्म झाला. इथून सुरू झालेला त्यांचा प्रवास भारतीय राजकारणात दरवर्षी नवे इतिहास रचत आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी त्यांनी आरएसएसच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात पाऊल ठेवलं. पुढे १९८७ मध्ये, वयाच्या ३७ व्या वर्षी ते गुजरात भाजपचे सरचिटणीस बनले. २००१ मध्ये त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. गुजरात दंगलीनंतरचे वाद आणि कायदेशीर लढायांचा सामना करत २०१४ मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले. आज जगातल्या सर्वात ताकदवान नेत्यांमध्ये मोदींची गणना होते. संघ परिवाराने पाहिलेली अनेक स्वप्ने मोदींच्या काळात सत्यात उतरली. अयोध्येतील राम मंदिर, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवणे आणि वक्फ कायद्यातील दुरुस्ती यांसारखे मोठे निर्णय त्यांनी घेतले. याशिवाय राज्यांमध्ये समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या दिशेनेही पावलं उचलली जात आहेत.
निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम देत नरेंद्र मोदींनी गेल्या वर्षभरात पक्ष आणि सरकारवर आपली मजबूत पकड पुन्हा सिद्ध केली. लोकसभा निवडणुकीतील फटक्यानंतर 'मोदी युग' संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, पण सलग विधानसभा निवडणुका जिंकून मोदींनी हे अंदाज खोटे ठरवले. यावर्षी पश्चिम बंगालमध्ये एकहाती नेतृत्व करत मिळवलेल्या दणदणीत विजयातून मोदींनी आपली ताकद पुन्हा दाखवून दिली. पक्ष आणि सरकारवर त्यांनी आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय. मोदींवर कडाडून टीका करणारे विरोधी नेतेही रातोरात एनडीएमध्ये सामील होताना भारतीय लोकशाहीने पाहिलं. पण अवघ्या एका महिन्यात तरुणांच्या उफाळून आलेल्या रागाने राष्ट्रीय राजकारणाचं चित्रच बदलून टाकलं. ब्रिक्स परिषदेत जागतिक नेत्यांनी मोदींच्या नेतृत्वाचं कौतुक केलं असलं, तरी जंतरमंतरवरील आंदोलनाचे पडसाद अजूनही देशभरात उमटत आहेत. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश आणि स्वतःच्या गुजरातसह ७ राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. अशा वेळी तरुणांचा हा रोष शांत करणं हेच मोदींसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे.
वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसोबतच, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून सत्तेत सलग २५ वर्षे पूर्ण केल्याचा आनंदही भाजप महिनाभर चालणाऱ्या कार्यक्रमांमधून साजरा करत आहे. आज संध्याकाळी ६ वाजल्यापासून देशभरात दिवे लावण्याचं आवाहन भाजपने केलंय. सर्व एनडीए नेते आज वाराणसीतील कार्यक्रमात मोदींसोबत सहभागी होणार आहेत. जिथे गरज असेल तिथे नमते घेणे आणि जिथे गरज असेल तिथे ताकद दाखवणे, ही मोदींची काम करण्याची स्टाईल आहे. पण आता जेन-झी (Gen Z) तरुणांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन मोदी पुन्हा एकदा बाजी मारणार का, हा खरा प्रश्न आहे. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींना पर्याय कोण, यावर भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही.

