Hardik Pandya Gujarat Titans - Mumbai Indians : हार्दिकला परत टीममध्ये घ्यायला गुजरात टायटन्सचं मॅनेजमेंट तयार होतं. त्यांनी सध्याचा कॅप्टन शुभमन गिलशीही चर्चा केली होती आणि गिलनेही याला होकार दिला होता. पण हार्दिकने कॅप्टन्सीची अट ठेवल्याने सगळं गणित बिघडलं.
मुंबई : आयपीएलच्या पुढच्या सीझनआधी खेळाडूंच्या अदलाबदलीच्या चर्चांना ऊत आला आहे. यातच मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो मुंबई इंडियन्स सोडण्याच्या तयारीत असून, आपल्या जुन्या टीम गुजरात टायटन्समध्ये परत जाण्यासाठी उत्सुक होता. पण त्याने कॅप्टन्सीची मागणी केल्यामुळे हा 'ट्रेड' फिस्कटल्याची माहिती समोर आली आहे.
मला कॅप्टन बनवा, हार्दिकची अट?
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या मॅनेजमेंटला हार्दिकला परत टीममध्ये घ्यायला काहीच हरकत नव्हती. त्यांनी सध्याचा कॅप्टन शुभमन गिलशी यावर चर्चा केली, आणि गिलनेही या 'ट्रेड'ला हिरवा कंदील दाखवला होता. पण, टीममध्ये परत यायचं असेल तर मला कॅप्टन बनवा, अशी अट हार्दिकने ठेवली. ही अट समोर येताच गुजरात फ्रँचायझीने या डीलमधून माघार घेतली, असं 'द इंडियन एक्सप्रेस'च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
कोणत्याही फ्रँचायझीशी थेट चर्चा नाही, हार्दिकच्या अधिकृत प्रवक्त्याकडून स्पष्टीकरण
दरम्यान, हार्दिक पांड्याने कोणत्याही फ्रँचायझीशी थेट चर्चा केलेली नाही, असं त्याच्या अधिकृत प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे. खेळाडूंच्या अदलाबदलीबद्दल काही चर्चा सुरू असेल, तर ती पूर्णपणे मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटमार्फतच होत आहे, असंही त्यांनी सांगितलं. हार्दिकने २०२२ मध्ये गुजरातला पहिल्याच सीझनमध्ये आयपीएल चॅम्पियन बनवलं होतं आणि पुढच्या वर्षी फायनलमध्ये नेलं होतं. त्यानंतर तो मुंबईत परतला, जिथे त्याला रोहित शर्माच्या जागी कॅप्टन बनवलं गेलं. पण त्याला फॅन्स आणि ड्रेसिंग रूममधून फारसा पाठिंबा मिळाला नाही.
हार्दिक नव्या टीमच्या शोधात असल्याची चर्चा
मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीनंतर टीममध्ये मोठ्या बदलांची शक्यता आहे. त्यामुळेच हार्दिक नव्या टीमच्या शोधात असल्याचं बोललं जातंय. गुजरातशिवाय चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या टीम्ससोबतही 'ट्रेडिंग'साठी चर्चा सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


