रॉयल एनफिल्ड कंपनी त्यांच्या १२५ व्या वर्धापन दिनानिमित्त २० सप्टेंबर २०२६ ला जगभरात 'वन राईड २०२६' आयोजित करणार आहे. ६० हून अधिक देशांमध्ये होणारी ही बाईक राईड हिमालयीन पर्यावरण आणि हिमबिबट्यांच्या संवर्धनासाठी असेल.

यकॉनिक भारतीय टू-व्हीलर ब्रँड रॉयल एनफिल्ड त्यांच्या १२५ व्या वर्धापन दिनाचं सेलिब्रेशन एकदम दणक्यात करणार आहे. कंपनीने २० सप्टेंबर २०२६ रोजी जगभरात 'वन राईड २०२६' (One Ride 2026) आयोजित करण्याची घोषणा केली आहे.

एकाच दिवशी ६० हून अधिक देशांमध्ये १६०० पेक्षा जास्त राईड्स आयोजित केल्या जातील. पण यंदाचा उद्देश फक्त बाईक चालवणं एवढाच नाहीये. कंपनीने या राईडला हिमालयीन पर्यावरण आणि तिथे राहणाऱ्या हिमबिबट्यांच्या (Snow Leopards) संवर्धनाशी जोडलं आहे. या राईडमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रायडरच्या नावाने रॉयल एनफिल्ड हिमबिबट्यांच्या संवर्धनासाठी निधी देणार आहे.

मुंबई ते माद्रिद; साओ पाउलो ते सिडनी

रॉयल एनफिल्डचा १२५ वा वर्धापन दिन असल्यामुळे यंदाची 'वन राईड' खूप मोठ्या प्रमाणावर आयोजित केली जातेय. जगातील वेगवेगळ्या प्रमुख शहरांमधून बाईक रायडर्स एकाच वेळी रस्त्यावर उतरतील. मुंबईपासून माद्रिदपर्यंत आणि साओ पाउलोपासून सिडनीपर्यंत लोक आपल्या रॉयल एनफिल्ड बाईक्सवर या राईडमध्ये सहभागी होतील. जगभरातील रॉयल एनफिल्ड प्रेमींना त्यांच्या बाईक प्रेमाच्या माध्यमातून एकत्र आणणं, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचं कंपनीने स्पष्ट केलंय.

गेल्या वर्षी ५३,००० हून अधिक जणांचा सहभाग

'वन राईड'ला दरवर्षी लोकांचा तुफान प्रतिसाद मिळतो. २०२५ मध्ये झालेल्या वन राईडमध्ये ५३,००० पेक्षा जास्त बाईक रायडर्स सहभागी झाले होते, अशी माहिती रॉयल एनफिल्डने दिली. यंदा हा आकडा आणखी वाढेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे.

हिमबिबट्यांचं संवर्धन हेच मुख्य लक्ष्य

हिमालय आणि रॉयल एनफिल्डचं नातं खूप जुनं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून बाईक रायडर्स नेहमीच हिमालयीन भागात राईडसाठी जात असतात. हेच नातं आणखी घट्ट करण्यासाठी यंदाच्या वन राईडला हिमबिबट्यांच्या संवर्धनाशी जोडण्यात आलंय. एका आकडेवारीनुसार, भारतात सध्या फक्त ७१८ हिमबिबटे उरले आहेत. हिमालयाच्या वरच्या पट्ट्यातील पर्यावरणाचा समतोल राखण्यात या हिमबिबट्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते.

१०,५०० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त भागात काम

सामाजिक जबाबदारीचा (CSR) भाग म्हणून रॉयल एनफिल्ड हिमालयातील विविध भागात हिमबिबट्यांच्या संवर्धनासाठी काम करत आहे. हिमाचल प्रदेश, लडाख, उत्तराखंड, सिक्कीम आणि जम्मू-काश्मीर यांसारख्या भागातील स्थानिक लोकांशी हातमिळवणी करून हे संवर्धनाचं काम सुरू आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे काम आतापर्यंत १०,५०० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त भागात पसरलं आहे. 'वन राईड २०२६' च्या माध्यमातून या कामाला आणखी बळ देण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे.

'हिमालय आमचं हृदय आणि घर'

रॉयल एनफिल्डशी जोडलेल्या प्रत्येकाच्या मनात हिमालयासाठी एक खास जागा आहे, असं कंपनीचे ब्रँड आणि स्ट्रॅटेजी प्रेसिडेंट मोहित धर जयाल यांनी सांगितलं. ते म्हणाले की, बाईक रायडर्ससाठी हिमालय एखाद्या तीर्थक्षेत्रासारखा आहे, पण हिमबिबट्यांसाठी ते त्यांचं खऱ्या अर्थाने घर आहे. कंपनीच्या १२५ वर्षांच्या प्रवासाचं सेलिब्रेशन करताना जगभरातील रायडर्सना एकत्र आणण्याची आणि आपली जबाबदारी पार पाडण्याची संधी 'वन राईड २०२६' मुळे मिळत आहे. १२५ व्या वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश जगभर पोहोचवणं, हेच रॉयल एनफिल्डच्या यंदाच्या वन राईडचं मुख्य उद्दिष्ट आहे.