रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ला थेट भिडण्यासाठी ट्रायम्फ आपली नवी 'बोनव्हिल 400' (Bonneville 400) भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. 2026 च्या दिवाळीपूर्वी ही बाईक मार्केटमध्ये येऊ शकते. पु
बाईक लव्हर्ससाठी एक भारी बातमी आहे. ट्रायम्फ मोटरसायकल्स (Triumph Motorcycles) लवकरच आपली नवी बोनव्हिल 400 (Bonneville 400) भारतीय मार्केटमध्ये उतरवणार असल्याची चर्चा आहे. 2026 च्या दिवाळीआधीच ही बाईक रस्त्यांवर धावताना दिसू शकते. ट्रायम्फच्या सध्याच्या 400 सीसी सीरिजमधल्या इतर मॉडेल्सप्रमाणेच, ही नवी बाईकही पुण्यातल्या बजाज ऑटो प्लांटमध्येच तयार केली जाईल. लोकल मॅन्युफॅक्चरिंगमुळे कंपनीला या बाईकची किंमत आवाक्यात ठेवता येईल आणि रेट्रो लूक आवडणाऱ्या जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल.
क्लासिक लूकवाली बोनव्हिल 400
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 आणि होंडा सीबी350 सारख्या रेट्रो मोटरसायकल्सना टक्कर देण्यासाठी बोनव्हिल 400 मार्केटमध्ये येत आहे. या बाईकमध्ये तुम्हाला सरळ रायडिंग पोझिशन, लांब आणि सपाट सीट, वायर-स्पोक व्हील्स, ड्युअल रिअर शॉक ॲब्जॉर्बर्स आणि क्रोम फिनिश पाहायला मिळेल. नुकत्याच समोर आलेल्या स्पाय फोटोंमध्ये या बाईकला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स असल्याचं दिसतंय. स्पीड 400 मध्ये वापरलेल्या अपसाईड-डाऊन फोर्क्सपेक्षा हे वेगळे आहेत. बाईकचा क्लासिक लूक अधिक उठून दिसावा म्हणूनच हे टेलिस्कोपिक फोर्क्स वापरल्याचा अंदाज आहे.
विंटेज डिझाईन आणि खास फीचर्स
बोनव्हिल 400 मध्ये टियरड्रॉप आकाराची पेट्रोल टाकी, गोल एलईडी हेडलाईट, मोठे मडगार्ड्स आणि गोल साईड पॅनल्स मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, विंटेज स्टाईलचा एक्झॉस्ट (सायलेन्सर) या बाईकच्या पारंपारिक रोडस्टर लूकला आणखी भारी बनवेल. टेस्टिंग दरम्यान दिसलेल्या बाईक्समध्ये वायर-स्पोक व्हील्स आणि ट्यूबवाले टायर्स वापरल्याचंही समोर आलंय. अर्थात, ट्युबलेस टायर्सच्या तुलनेत ट्यूबवाल्या टायर्सचं पंक्चर काढायला थोडा जास्त वेळ लागू शकतो.
36.5 bhp पॉवरची अपेक्षा
रिपोर्ट्सनुसार, बोनव्हिल 400 मध्ये ट्रायम्फचं 349 सीसी, सिंगल-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन दिलं जाऊ शकतं. कंपनीच्या सध्याच्या 400 सीसी मॉडेल्सच्या इंजिन सेटअपचा विचार करता, ही नवी बाईक जवळपास 36.5 bhp पॉवर आणि 32 Nm टॉर्क जनरेट करू शकते. या इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे.
क्लासिक 350 पेक्षा जास्त पॉवरफुल
रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 मधलं 349 सीसी इंजिन 20.2 bhp पॉवर आणि 27 Nm टॉर्क देतं. तर, होंडा सीबी350 चं 348.6 सीसी इंजिन साधारण 21 bhp पॉवर आणि 29.5 Nm टॉर्क जनरेट करतं. या दोन्ही बाईक्सच्या तुलनेत बोनव्हिल 400 जास्त पॉवर देईल अशी अपेक्षा आहे. पण फक्त जास्त पॉवर असून चालत नाही; रोजच्या वापरात गाडी चालवण्याचा अनुभव स्मूथ आणि आरामदायक असावा, यासाठी इंजिन आणि चेसिसचं ट्युनिंगही परफेक्ट असणं गरजेचं आहे.
किंमत किती असेल?
ट्रायम्फने अद्याप बोनव्हिल 400 च्या किंमतीची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, या बाईकची एक्स-शोरूम किंमत साधारण ₹2.3 लाख ते ₹2.6 लाखांच्या घरात असू शकते. जर ही बाईक याच बजेटमध्ये आली, तर ती रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 आणि होंडा सीबी350 सारख्या मॉडेल्सना थेट फाईट देईल. ज्या ग्राहकांना रेट्रो डिझाईनसोबतच जास्त पॉवर हवी आहे, त्यांना ही बाईक नक्कीच आकर्षित करेल.
ट्रायम्फची 400 सीसी सीरिज होणार आणखी मोठी
बोनव्हिल 400 च्या एन्ट्रीमुळे भारतातली ट्रायम्फची 400 सीसी सीरिज आणखी मोठी होईल. या सेगमेंटमध्ये आधीपासूनच स्पीड 400, स्पीड टी4, स्क्रॅम्बलर 400 एक्स, स्क्रॅम्बलर 400 एक्ससी, थ्रक्सटन 400 आणि ट्रॅकर 400 सारखी मॉडेल्स आहेत. आता फक्त बोनव्हिल 400 ची लाँच डेट, तिचे अचूक स्पेसिफिकेशन्स आणि अधिकृत किंमत याबद्दल ट्रायम्फच्या घोषणेची प्रतीक्षा आहे.


