Mumbai : अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या झाकलेल्या पुतळ्याचे अनावरण केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यावरून ठाकरे कुटुंबाने सरकारवर तीव्र टीका केली.
Mumbai : नवी मुंबईत मनसेचे युवा नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवला होता. अमित ठाकरे यांनी त्याचे अनावरण करून सन्मान राखला, असे म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या भावाच्या समर्थनार्थ सरकारला सरळ प्रश्न केला—“अमितने सन्मान केला तरी त्याच्यावर गुन्हा का?”. त्यांनी ही दादागिरी मोडून काढण्याचा इशाराही दिला.
शर्मिला ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया – “मलाही अभिमान”
प्रभादेवी येथे नव्या कॅफेच्या उद्घाटनावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शर्मिला ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, लेकावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना अभिमान आहे. “मीही वाट बघते माझ्यावर कधी केस होतो,” असे त्यांनी परखडपणे म्हटले. त्यांनी सरकारवर टीका करताना सांगितले की, “यांना निवडणुकीसाठी केवळ महाराज दिसतात. किल्ले हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण आम्ही होऊ देणार नाही.” त्यांनी 1800 कोटींच्या जमीन घोटाळ्यावरही सरकारला लक्ष्य केले.
सुप्रीम कोर्टातील प्रलंबित सुनावणीवरून संताप
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खटल्यांची सुप्रीम कोर्टात तीन वर्षांपासून सुनावणी प्रलंबित आहे, यावरही शर्मिला ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. “सुप्रीम कोर्ट एवढं बिझी आहे की त्यांना वेळच मिळत नाही. पक्षच बळकावून घेतले जात आहेत,” असे त्यांनी आरोप केले. कोर्ट जानेवारीत निकाल देणार असल्याचे सांगितले असले, तरी त्यापूर्वीच निवडणुका होऊन जातील, असेही त्यांनी म्हटले. आणि तसे असेल तर “मैदानात या आणि निवडणूक लढा,” असे आव्हानही त्यांनी दिले.
बिहार निवडणूक, मतदान आणि आकडेवारीवरून सवाल
बिहार निवडणुकीत 3.5 कोटी मतदार असूनही 7 कोटी मतदान कसे झाले? असा सवाल उपस्थित करत शर्मिला ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणातील “खोट बोला पण रेटून बोला” संस्कृतीवर टीका केली. महाराष्ट्रातून ट्रेनभर लोक बिहारला गेले, ते तिकडे आणि मुंबईत दोन्हीकडे मतदान करणार, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेच्या पक्ष व चिन्हावरील सुनावणीला उशीर होत असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.


