Navi Mumbai : नवी मुंबईतील नेरुळ भागात चार महिन्यांपासून झाकून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे परवानगीशिवाय अनावरण केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे आणि 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल झाला आहे. 

Navi Mumbai : नवी मुंबईतील नेरुळमध्ये राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मागील चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतीक्षेत झाकून ठेवण्यात आला होता. ही बाब कळताच मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी कोणतीही परवानगी न घेता पुतळ्याचे अनावरण केले. या कृतीनंतर पोलिसांनी त्यांच्यासह सुमारे 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. हा अमित ठाकरे यांच्या कारकिर्दीतील पहिलाच गुन्हा असल्याची माहिती समोर आली आहे.

कार्यक्रमाला आल्यानंतर घेतला अचानक निर्णय

अमित ठाकरे हे कौपरखैरणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांना महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवल्याची माहिती मिळाली. ही स्थिती पाहताच त्यांनी मनसैनिकांसह त्या ठिकाणी जाऊन पोलिसांच्या उपस्थितीतच पुतळा उघडला. अनावरणावेळी मनसैनिक आणि पोलिसांमध्ये किरकोळ ढकलाढकली झाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

“महाराजांच्या पुतळ्याला धूळ खाताना पाहवत नव्हतं” 

या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले की, पुतळा चार महिन्यांपासून झाकून ठेवला असल्याने त्यावर धूळ साचत होती. लोकांच्या मागणीनुसार उभारलेल्या पुतळ्याचे कोणत्याही मंत्री किंवा नेत्यानं अनावरण न केल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. “आपण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतो त्यांच्यासाठी वेळ मिळत नाही, हीच सर्वात दुर्दैवी बाब आहे,” असे ते म्हणाले.

“महाराजांसाठी अनेक केसेस अंगावर घेऊ”

गुन्हा दाखल होण्याबाबत प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले, “ही माझ्या आयुष्यातली पहिली केस असेल, पण महाराजांसाठी अशा कित्येक केसेस अंगावर घ्यायला मी तयार आहे.” त्यांच्या या भूमिकेमुळे मनसैनिकांनीही जोरदार समर्थन व्यक्त केले. नवी मुंबईत मागील काही दिवसांत अनेक मोठे नेते आणि मंत्री येऊनही पुतळ्याचे अनावरण न झाल्याबाबत त्यांनी टीकास्त्र सोडले.