Mumbai CNG Crisis : मुंबईच्या वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने रविवारी दुपारपासून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील CNG पुरवठा थांबला आहे. 

Mumbai CNG Crisis : मुंबईतील वडाळा परिसरातील आरसीएफ कंपाऊंडमध्ये गेल गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये रविवारी दुपारी तांत्रिक बिघाड झाला. या बिघाडामुळे मुंबईकडे जाणारा CNG पुरवठा अचानक पूर्णपणे बंद पडला. गेल्या 24 तासांपासून CNG पंपांवर एकही टँकर पोहोचलेला नसल्याने पंप कोरडे पडले आहेत. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील बहुतांश पंपांवरील CNG संपल्याने नागरिक, रिक्षावाले आणि टॅक्सी चालक पूर्णपणे अडचणीत आले आहेत.

सोमवारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती

सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर निघालेल्या नागरिकांचे हाल झाले असून रस्त्यावर रिक्षा आणि टॅक्स्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. अनेक चालकांच्या वाहनांमधील उरलेली CNGही संपत आली आहे. दुपारपर्यंत पुरवठा सुरू न झाल्यास रिक्षा-टॅक्सीच नव्हे तर खासगी CNG वाहने आणि कॅबची वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊ शकते. शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि प्रवाशांना रस्त्यावर ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे.

संपूर्ण महानगर प्रदेशातील 133 CNG पंपांवर परिणाम

आरसीएफमधील पाईपलाईन बिघाडामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला जाणारा गॅस पुरवठा ठप्प झाला. त्याचे पडसाद थेट संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशावर उमटले असून जवळपास 133 सीएनजी पंप बंद पडले आहेत. रिक्षा, टॅक्सी, कॅब्स आणि बेस्टच्या काही बसेस CNGवर चालत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घरगुती ग्राहकांना PNGचा पुरवठा सुरळीत ठेवला जाईल, अशी माहिती एमजीएलकडून देण्यात आली आहे.

दुरुस्तीस किती वेळ? अनिश्चितता कायम

पाईपलाईनमधील बिघाड नेमका किती गंभीर आहे आणि दुरुस्तीला किती वेळ लागेल, याबाबत कंपनीकडून अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. पुरवठा कधी सुरू होईल याबद्दल अनिश्चितता असल्याने नागरिक आणि वाहनचालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोलमडल्याने सार्वजनिक जीवनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.