Malad Train Stabbing : मालाड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये कॉलेज प्राध्यापकाची हत्या करणाऱ्या आरोपीला अवघ्या 12 तासांत अटक करण्यात बोरिवली जीआरपीला यश आले आहे. 

Malad Train Stabbing : मालाड रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये झालेल्या प्राणघातक चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर अवघ्या 12 तासांत आरोपीला अटक करण्यात बोरिवली सरकारी रेल्वे पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि रेल्वेच्या फेशियल रेकग्निशन सिस्टिम (FRS) च्या मदतीने पोलिसांनी आरोपीच्या हालचालींचा मागोवा घेत त्याला रविवारी सकाळी अटक केली.

लोकल ट्रेनमध्ये वादातून हत्या

शनिवारी मालाड स्थानकावर लोकल ट्रेनमधून उतरत असताना झालेल्या वादात 32 वर्षीय कॉलेज लेक्चरर आलोक कुमार सिंग यांच्यावर चाकूने वार करण्यात आला होता. या हल्ल्यात आलोक सिंग यांचा मृत्यू झाला. आरोपी म्हणून ओंकार एकनाथ शिंदे (रा. मालाड पूर्व) याचे नाव पुढे आले असून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

200 सीसीटीव्ही स्कॅन, पाच पथकांची स्थापना

घटनेनंतर जीआरपीने तातडीने पाच पथके तयार केली. रेल्वे प्लॅटफॉर्म, फूट ओव्हरब्रिज, स्टेशन परिसर आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेपर्यंत सुमारे 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. शहर पोलिसही शोध मोहिमेत सहभागी झाले. एफआरएसच्या मदतीने आरोपीचा रोजचा प्रवास मार्गही पोलिसांना समजला.

ऑटोरिक्षा स्टँडवरून अटक

सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कुरार गाव परिसरात दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुप्तचर यंत्रणा सक्रिय करण्यात आली. आरोपी रविवारी प्रवास करणार नाही अशी शक्यता असूनही पोलिसांनी पाळत ठेवली. सकाळी 7.40 वाजता मालाड स्थानकाजवळील ऑटोरिक्षा स्टँडवरून ओंकार शिंदे याला अटक करण्यात आली आणि त्याला बोरिवली जीआरपी कार्यालयात नेण्यात आले.

गुन्ह्याची कबुली, पोलिस कोठडी

पोलिसांनी आरोपीला सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चौकशीदरम्यान, रागाच्या भरात चिमट्याने वार केल्याचे त्याने मान्य केले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक डी.एम. खुपेरकर यांनी दिली.