Mumbai Crime : मुंबईतील एका महिला डॉक्टरने प्रियकराच्या मानसिक छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रियकर फजल मोहम्मद खान याला अटक केली असून सुसाईड नोटमधील उल्लेखांमुळे प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
Mumbai Crime : मुंबईत एका महिला डॉक्टरने प्रियकराच्या कथित छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 8 मार्च रोजी स्तुती बजरंग सोनावणे या तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवले. या प्रकरणात अँटॉप हिल पोलीस स्थानक पोलिसांनी तिचा प्रियकर फजल मोहम्मद खानयाला लोअर परेल येथून अटक केली असून न्यायालयाने त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुसाईड नोटमधून छळाचा उल्लेख
डॉ. स्तुती सोनावणे यांच्या आत्महत्येनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना सहा पानांची सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये फजल खानकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख करण्यात आला आहे. स्तुतीने आपल्या मैत्रिणीलाही या छळाबाबत सांगितले होते. “तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील,” अशी धमकी फजल वारंवार देत असल्याचा उल्लेख त्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
डेटिंग अॅपवरून झाली ओळख
पोलिसांच्या माहितीनुसार, स्तुती सोनावणे आणि फजल खान यांची ओळख एका डेटिंग अॅपवरून झाली होती. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र या काळात दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. या भांडणांच्या वेळी फजल खान स्तुतीला मारण्याची धमकी देत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पालकांनी दरवाजा तोडल्यावर प्रकार उघड
8 मार्च रोजी स्तुतीचे आई-वडील जेवणासाठी बाहेर गेले होते. ते परत आल्यानंतर स्तुतीने खोलीचा दरवाजा उघडला नाही. संशय आल्याने तिच्या वडिलांनी दरवाजा तोडला असता स्तुतीने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.
तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता
शवविच्छेदन अहवालानुसार डॉ. स्तुती सोनावणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात अँटॉप हिल पोलिस अधिक तपास करत असून आरोपीच्या चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


