Kalyan Taloja Metro : कल्याण-तळोजा ‘मेट्रो १२ अ’ प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. १८.४ किमी लांबीच्या या विस्तारित मार्गामुळे डोंबिवली, मानपाडा, काटई नाका ते खुटारी गावापर्यंतच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

Kalyan Taloja Metro : कल्याण ते तळोजा दरम्यान धावणाऱ्या ‘मेट्रो १२’ मार्गाच्या विस्तारीकरणाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मेट्रो १२ अ’ या विस्तारित प्रकल्पाला मंजुरी दिली असून, कल्याण शिळ फाटा मार्गे दहिसर मोरी ते तळोजा असा हा मार्ग विस्तारला जाणार आहे. तब्बल ८,४१४.५३ कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

प्रकल्पाला अधिकृत मंजुरी

खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी ८ हजार ४१४.५३ कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पासोबतच एमएमआरडीए मार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणीही करण्यात आली. कल्याण-डोंबिवली परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता मेट्रो, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, रेल्वे पूल आणि रस्ते रुंदीकरण यांसारख्या प्रकल्पांना गती देण्यात येत आहे.

कोणकोणत्या भागांना मिळणार फायदा?

‘मेट्रो १२ अ’ मार्ग दोन टप्प्यांत विकसित होणार आहे. या मार्गावर डोंबिवली, मानपाडा, काटई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडले गाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसर मोरी, दहिसरगाव, किरवली गाव, रोहींजण आणि खुटारी गाव या भागातील नागरिकांना थेट फायदा होणार आहे.खुटारी येथे मेट्रो १२ आणि मेट्रो १२ अ एकत्र जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून धावणारी ही पहिली मेट्रो सेवा ठरणार आहे.

भविष्यातील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत

या विस्तारित मार्गाची एकूण लांबी १८.४ किलोमीटर असून त्यापैकी सुमारे १०.५ किलोमीटरवर सध्या बांधकाम सुरू आहे. काटई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो १४ सोबत ट्रॅक आणि स्टेशन शेअरिंगचा प्रस्ताव आहे.तसेच निळजे डेपो, मेट्रो १४ आणि ठाणे येथील राष्ट्रीय हायस्पीड रेल्वेच्या बुलेट ट्रेन स्थानकाशीही या मार्गाची जोडणी केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात नवी मुंबई, कांजूरमार्ग आणि मुंबईकडे प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे.

प्रकल्पाला गती देण्यासाठी सूचना

प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक अतिक्रमणे हटवून जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विकासकामांचा आढावा घेताना प्रशासनाला कामात गती आणण्याचे निर्देश देण्यात आले.