लोकल ट्रेनमध्ये २२ वर्षीय तरुणाच्या पोटात चाकू भोसकून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. चालत्या ट्रेनमध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हल्लेखोर आरोपी पसार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

मुंबई : मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाची चालत्या ट्रेनमध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. २३ जून रोजी, मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास ट्रेनमध्ये ही हत्या झाला. लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्याकरुन झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने २२ वर्षीय मयांक लोहार नावाच्या तरुणाच्या पोटात चाकू भोसकला. विरार लोकल ट्रेनमध्ये ही घटना घडली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नेमकं प्रकरण काय?

मयांक लोहार हा २२ वर्षीय तरुण विरारमध्ये राहतो. मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास बोरिवली ते अंधेरी या स्टेशनदरम्यान ही घटना घडली. मयांक रात्री ट्रेनमधून घरी जात असताना त्याचा ट्रेनचा दरवाजा बंद करण्यावरुन एका व्यक्तीशी वाद झाला. या वादादरम्यान त्या आरोपीला इतर ट्रेनमधील प्रवाशांनी मारहाण केली. पण संतापलेल्या आरोपीने स्वत: जवळच्या बॅगमधून चाकू काढला आणि मयांकच्या पोटात, छातीत भोसकला. मयांक रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर हल्लेखोर आरोपी बोरिवली स्थानकांत ट्रेन थांबण्याआधीच उतरला आणि पळून गेला.

त्यानंतर तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रेल्वे पोलिसांनी मयांकला ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी त्यानंतर मयांकच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली. आता बोरिवली स्टेशनवरुन पसार झालेल्या हल्लेखोर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथकं तैनात करण्यात आली आहेत.

मयांक लोहार हा अंधेरीला चकाला भागातील वेस्टसाइड इथे नोकरी करत होता. त्याने फायनान्स मार्केटिंगचं शिक्षण घेतलं होतं. मयांक मूळचा नेपाळचा होता. पण तो विरारमध्ये राहत होता. दररोज तो विरार ते अंधेरी असा प्रवास करायचा.

मयांक सुरुवातीला त्याची एक बहीण आणि दोन भावांसोबत अंधेरीत राहत होता. पण त्यांचं अंधेरीतील घर रिडेव्हलपमेंटला गेल्याने तो विरारमध्ये भोईरपाडा इथे राहायला आला होता. अतिशय शांत स्वभावाच्या मयांकचा अशा दुर्दैवी मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.