सार
मुंबईत वायू प्रदूषण वाढले गेल्यास त्याची आता थेट तक्रार करता येणार आहे. या संदर्भातील तक्रारीसाठी मुंबई महापालिकेकडून एक अॅप तयार करण्यात आले आहे.
BMC Launched App for Air Pollution Complaints : मुंबईतील वायू प्रदूषणाच्या तक्रारी नागरिकांना करायच्या असल्यास त्यांच्यासाठी एक संकेतस्थळ (Website) आणि मोबाईल अॅप्लिकेशन (Mobile App) तयार करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला (BMC) उच्च न्यायालयाने (Bombay High Court) दिल्या होत्या. त्यानुसार, आता मुंबई महापालिकेने अॅण्ड्रॉइड युजर्ससाठी 'मुंबई एअर' (Mumbai Air) नावाचे अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून वायू प्रदूषणाची तक्रार नागरिकांना करता येणार आहे.
‘मुंबई एअर’ अॅपमध्ये शहरातील प्रत्येक विभागानुसार विभागणी करण्यात आली आहे. सध्या ‘मुंबई एअर’ अॅप अॅण्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध आहे. लवकरच आयओएससाठी (iOS) उपलब्ध करून दिले जाईल असे सांगण्यात आले आहे.
मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपययोजनांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर सुरू आहे. नागरिकांना आपल्या भागातील वायू प्रदूषणाची तक्रार मांडण्यासाठीचे डिजिटल माध्यम उपलब्ध करून देण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Ashwini Joshi) यांनी पर्यावरण विभागाला दिले होते.
यानुसार, पर्यावरण विभागाने वायू प्रदूषणाची तक्रार नागरिकांना नोंदवता येण्यासाठी एक मोबाइल अॅप आणि संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. याशिवाय तक्रार केल्यानंतर त्यावर आतापर्यंत काय कार्यवाही करण्यात आली याचा आलेखही नागरिकांना अॅपच्या डॅशबोर्डमध्ये दिसणार आहे.
मुंबईकारांना ‘मुंबई एअर’ अॅपच्या माध्यमातून मागील सहा महिन्यांच्या तक्रारी पाहाता येणार आहेत. वायू प्रदूषणासंदर्भातील तक्रार दाखल करण्यासाठी नागरिकांना तक्रारीचे स्वरूप, तक्रारीचा तपशील, आपले ठिकाण (लोकेशन), रस्त्याचे नाव, विभागाचे नाव, तक्रारीशी संबंधित छायाचित्र (फोटो) आदी बाबींचा तपशील प्रत्येक नवीन तक्रारीसोबत भरावा लागणार आहे.
दरम्यान, उपायुक्त, विभागीय पातळीवर सहाय्यक आयुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना अॅपवरील डॅशबोर्डच्या माध्यमातून तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्राधान्य राहणार आहे.
Mumbai Air अॅप असे करा सुरू
- सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवर Mumbai Air अॅप डाउनलोड करा
- अॅप सुरू केल्यानंतर सर्व परवानग्यांवर क्लिक करा.
- मोबाइल क्रमांक अॅप सुरू करण्यासाठी द्या.
- मोबाइलवर ओटीपी येईल तो भरा आणि व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा.
- अॅपमध्ये युजर्सने आपली वैयक्तिक माहिती दिल्यानंतर तुम्ही तेथून वायू प्रदूषणासंदर्भातील तक्रार नोंदवू शकता.
आणखी वाचा :
Mumbai Property Tax : मुंबईकरांना मोठा दिलासा, यंदाही मालमत्ता करवाढ नाही