- Home
- Maharashtra
- Weather Update : विदर्भात पाणीसंकट कायम, तर कोकणात 6 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा!
Weather Update : विदर्भात पाणीसंकट कायम, तर कोकणात 6 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा!
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. अशातच हवामान खात्याने आजचा पावसाचा अंदाज वर्तवला असून कोकणातील सहा जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.

राज्यातील पावसाची स्थिती
राज्यात पावसाची स्थिती विभागानुसार बदलती असून, कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली असतानाच विदर्भात मात्र पाणीसंकट गडद होत चाललं आहे. मुंबई, ठाणे, आणि उपनगरांमध्ये गुरुवारी संध्याकाळपासून पावसाने जोर धरला होता, पण शुक्रवारी पहाटेपासून हवामानाने विश्रांती घेतली. आज मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज
दुसरीकडे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सह्याद्री पट्ट्यात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या भागांतील नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. भंगसाळ नदीने रौद्ररूप धारण करून पुराचे पाणी पात्राबाहेर गेले आहे, त्यामुळे स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूरच्या घाटभागातील स्थिती
४ जुलै रोजी राज्याच्या बहुतांश भागात कोरडे हवामान पाहायला मिळणार आहे. मात्र, कोल्हापूरच्या घाटभागात आणि सिंधुदुर्गात अति मुसळधार पावसाचा इशारा आहे. पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासोबत काही भागांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
सातारा व पुण्यातील परिस्थिती
नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये येत्या चार दिवसांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर, सातारा व पुणे घाटमाथ्यावर दरड कोसळण्याचा धोका असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मराठवाड्यातील पावसाचा अंदाज
मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत आज हलकासा पाऊस राहील. ६ ते ७ जुलै दरम्यान येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
विदर्भातील पावसाचा अंदाज
विदर्भात अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणीसंकट गडद होत आहे. अनेक भागांत टँकरवरच पाणीपुरवठा सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात जून महिन्यात अपेक्षित 192 मिमी पावसापैकी केवळ 114 मिमी पाऊस झाला असून, ४१% इतका पावसाचा तूट नोंदवली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक लवकरात लवकर दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

