Thane : ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचे रखडलेले काम आता पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी शनिवार रात्रीपासून मंगळवारपर्यंत या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
Thane : ठाणे-घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट रस्ता खड्ड्यांनी विद्रूप झाला होता. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मिरा-भाईंदर महानगरपालिकेने ऑगस्ट महिन्यात या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू केले होते, परंतु गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवामुळे ते निम्म्यावरच थांबले होते.
तीन दिवस अवजड वाहनांना बंदी
दिवाळीपूर्वी हे रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी आता रस्त्याची दुरुस्ती पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी टाळण्यासाठी शनिवार रात्री १० पासून ते मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत गायमुख घाट रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही माहिती मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांनी जाहीर केली असून, या काळात वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्गांची व्यवस्था
या बंदी दरम्यान पालघरकडून ठाण्याकडे जाणारी अवजड वाहने शिरसाट फाटा–गणेशपुरी–चिंचोटी–खरबाव या मार्गाने वळवली जातील. गुजरातहून येणारी वाहने मनोर–वाडा नाका मार्गे, तर ठाण्याहून घोडबंदरकडे जाणारी वाहने वाय जंक्शन–नाशिक रोड–मानकोलीमार्गे जावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. हलक्या वाहनांना मात्र या रस्त्यावरून प्रवास करण्यास परवानगी आहे.
ओबीसी नेत्यांचा इशारा: “मुंबई, ठाणे, पुणे जाम करू!”
दरम्यान, ओबीसी आरक्षणाशी संबंधित शासन निर्णयावरून राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांनी ठाण्यातील संविधान चौकात आयोजित आंदोलनात सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले, “२ सप्टेंबरचा शासन निर्णय हा ओबीसींवर अन्याय करणारा आहे. तो रद्द न केल्यास मुंबई, ठाणे आणि पुणे जाम करू.” या आंदोलनात शेकडो ओबीसी बांधवांनी ‘पिवळी टोपी’ घालून सहभाग नोंदवला आणि शासनाविरोधात घोषणाबाजी केली.


