Ashok Kharat Case : स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात यांच्यावरील गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. या पथकाच्या प्रमुखपदी IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली असून तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा एकत्रित तपास होणार आहे.
Ashok Kharat Case : स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात सक्रिय असलेले अशोक खरात यांच्यावर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. निष्पक्ष आणि सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, या पथकाचे नेतृत्व तेजस्वीनी सातपुते करणार आहेत.
तीन गुन्ह्यांचा SIT मार्फत एकत्रित तपास
राज्य गृह विभागाच्या निर्णयानुसार, अशोक खरात यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या तीन स्वतंत्र गुन्ह्यांचा तपास आता SIT मार्फत एकत्रितपणे केला जाणार आहे. महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाने या प्रकरणाला उच्च प्राधान्य देत सर्व संबंधित कागदपत्रे आणि पुरावे SIT कडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत.
कोणकोणते गुन्हे नोंद?
- अशोक खरात यांच्याविरुद्ध विविध ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत—
- नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा
- नाशिक ग्रामीणमधील वावी पोलीस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप
- अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलीस ठाण्यात अश्लील फोटो व्हायरल केल्याचा गुन्हा
पेनड्राइव्हमधील 58 व्हिडिओंची तपासणी
या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या पेनड्राइव्हमध्ये 58 व्हिडिओ सापडले असून, त्यांची सखोल तपासणी SIT करणार आहे. यामध्ये इतर संभाव्य पीडित महिला, ट्रस्टशी संबंधित व्यवहार आणि राजकीय-धार्मिक संबंध यांचाही तपास होणार आहे.
सखोल चौकशीसाठी SIT सक्रिय
तेजस्वीनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील पथक तपासाची सूत्रे हाती घेणार असून तपासाच्या प्रगतीचा नियमित अहवाल पोलीस मुख्यालयाला सादर करण्यात येणार आहे. या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशोक खरात कोण?
अशोक खरात हे सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असून मर्चंट नेव्हीमधून निवृत्त अधिकारी आहेत. ते अंकशास्त्रज्ञ आणि कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट म्हणून ओळखले जात होते.
पोलीस कोठडी आणि पुढील तपास
सध्या अशोक खरात यांना २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. SIT च्या तपासातून आणखी किती महिलांचे शोषण उघड होईल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


