Rajasthan Accident : लेह-लडाख पर्यटनावरून परतणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील तरुणांच्या कारचा राजस्थानमध्ये भीषण अपघात झाला. पुलावरून कार कोसळल्याने तिघा तरुणांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे शहरात शोककळा पसरली आहे.

Rajasthan Accident : लेह-लडाख येथे पर्यटनासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील तरुणांच्या गटावर काळाने घाला घातला आहे. राजस्थानातील दिल्ली-मुंबई महामार्गावर बुधवारी झालेल्या भीषण अपघातात तिघा तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेले तरुण

या अपघातात कुणाल चोरडिया (२५, चिंचवड), मयुरेश पाडाळे (२३, म्हाळुंगे) आणि सिद्धान्त आल्हाट (२१, थेरगाव) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तिघेही तरुण शिक्षण घेत असून कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळत होते.

नेमकं काय घडलं?

पोलिसांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव, वाकड आणि म्हाळुंगे परिसरातील 10 ते 12 तरुणांचा गट 27 तारखेला लेह-लडाख आणि जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेला होता. पर्यटन संपवून परतताना राजस्थानातील कोटा परिसरात केथून पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारचा अपघात झाला. कार पुलावरून खाली कोसळल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.

पार्थिव आज शहरात आणणार

मृत तरुणांचे पार्थिव गुरुवारी सकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आणण्यात येणार आहे. मयुरेश आणि सिद्धान्त हे उच्च शिक्षण घेत होते आणि कुटुंबाच्या व्यवसायात मदत करत होते, तर कुणाल इंदिरा कॉलेजमध्ये बीबीएचे शिक्षण घेत होता.

स्थानिक प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन

या दुर्घटनेबाबत आमदार शंकर जगताप यांनी दु:ख व्यक्त करत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधल्याचे सांगितले. पीडित कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

बर्फवृष्टीमुळे काही दिवस अडकले होते

या गटातील सर्व तरुण कारगिल परिसरात झालेल्या प्रचंड बर्फवृष्टीमुळे पाच दिवस अडकले होते. रस्ते बंद झाल्यामुळे त्यांना पुढे जाता येत नव्हते. स्थानिक नेते आणि बीएसएफ अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते. मात्र, परतीच्या प्रवासातच हा दुर्दैवी अपघात घडला.

मित्राला बसला मानसिक धक्का

या गटातील आणखी एक तरुण अपघाताच्या एक दिवस आधी अस्वस्थ झाल्याने विमानाने घरी परतला होता. त्यामुळे तो या अपघातातून बचावला. मात्र, मित्रांच्या मृत्यूची बातमी कळताच त्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे.