कोल्हापुरात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख नियुक्तीनंतर पक्षात नाराजीचा भडका उडाला आहे. शहरप्रमुख हर्षल सुर्वे यांनी नियुक्तीवर तीव्र आक्षेप घेत नवीन जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरात ठाकरे गटाने नुकतीच जिल्हाप्रमुख पदाची नवी नियुक्ती केली असली, तरी ही घोषणा होताच पक्षात नाराजीचा भडका उडालेला दिसतो. माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी निवड झाल्यानंतर शहरप्रमुख हर्षल सुर्वे यांनी उघड नाराजी व्यक्त करत स्पष्ट शब्दांत सांगितले. “खंजीर खुपसणाऱ्यासोबत मी काम करणार नाही!”
नेमणुकीनंतर उत्साहाऐवजी गोंधळ
कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर पक्षात नवचैतन्य आणण्यासाठी इंगवले यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर उत्तर, दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. यावेळी इंगवले यांनी, “पूर्वीप्रमाणे शिवसेनेची ताकद पुन्हा उभी करू,” असा आत्मविश्वास व्यक्त केला. मात्र, त्यांची ही नियुक्ती पक्षात एकवटलेपणाच्या ऐवजी अंतर्गत संघर्षाचे नवे पर्व घेऊन आली आहे.
हर्षल सुर्वेंचा रोष, “ही निवड म्हणजे निष्ठावंतांवर अन्याय!”
शहरप्रमुख हर्षल सुर्वे यांनी आपली तीव्र नाराजी जाहीर करत इंगवले यांच्यावर गंभीर आरोप केले. “पाठीत खंजीर खुपसणारा माणूस जिल्हाप्रमुख? ज्याने अनेक नेत्यांची फसवणूक केली, अशा व्यक्तीसोबत काम करणं अशक्य आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी असा सवालही केला की, “एका रात्रीत काय घडलं की माझं निश्चित झालेलं नाव मागे घेतलं गेलं? आम्ही शिवसेना वाड्यावस्त्यांमध्ये पोचवली, निष्ठेने काम केलं, तरी आमची दखल घेतली गेली नाही.”
“हा जिल्हाप्रमुख नव्हे, तर एखाद्या टोळीचा प्रमुख”,सुर्वेंचा आरोप
सुर्वेंच्या म्हणण्यानुसार, ज्याचं जमिनीवर कुणाशीही संपर्क नाही, अशा व्यक्तीची नियुक्ती करून, शिवसेनेला गांधी मैदानापुरती मर्यादित करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. “हा कोल्हापूर जिल्हाप्रमुख नसून एखाद्या टोळीचा प्रमुख आहे,” अशी टीका करत त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, आपली नाराजी पक्षश्रेष्ठींना कळवली असून लवकरच उद्धव ठाकरे यांच्यासोबत थेट चर्चा करण्याची मागणी केली आहे.
संजय पवारही नाराज, भूमिका लवकरच स्पष्ट
या वादात आणखी एक महत्त्वाचं नाव म्हणजे शिवसेना उपनेते संजय पवार. यांचं आणि इंगवले यांचं जुने वादप्रकरण सर्वश्रुत आहे. आता हर्षल सुर्वेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय पवार देखील सोमवारी आपली भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पक्षश्रेष्ठींच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष
सध्या कोल्हापुरात शिवसेनेची मशाल पेटण्याऐवजी, पक्षातील वादाची धग अधिक तीव्र होत आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असणार? वाद मिटवण्यासाठी कोणते पावले उचलली जातील? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.


