Hindi Language Compulsion : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिंदी सक्तीच्या वादावरून शिक्षणाच्या दयनीय स्थितीकडे लक्ष वेधले आहे. शिक्षकांची कमतरता, पुस्तकांचा अभाव आणि शिक्षणावरील खर्च कमी होत असल्याची टीका त्यांनी केली. 

कोल्हापूर : देशभरात सुरू असलेल्या हिंदी सक्तीच्या वादावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली आहे. "शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत, पुस्तकांची कमतरता आहे, शिक्षणाची अवस्था दयनीय आहे, आणि अशा स्थितीत भाषा वाढवण्याचा आग्रह का?" असा सवाल त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना सरकारला विचारला.

“शिक्षणाचं मूळ भान सुटतंय...”

चव्हाण म्हणाले, “भाषेचा वाद हा दिशाभूल करणारा आहे. खऱ्या अर्थाने गरज आहे ती म्हणजे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची. पण दुर्दैवाने, केंद्र आणि राज्य सरकार दोघांनीही शिक्षणावरील खर्च कमी केला आहे." "कितीही भाषा शिल्लक ठेवा, पण शिकवायला शिक्षक नाहीत आणि शिकायला पुस्तकं नाहीत," अशी टीका करत त्यांनी सध्याच्या शैक्षणिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

हिंदी सक्तीवर ठाम भूमिका

देशात हिंदी ही लिंक लँग्वेज म्हणून वापरली जाते, हे वास्तव असून त्याचा कोणीही विरोध करत नाही. पण चव्हाणांनी स्पष्ट सांगितले की, इंग्रजी ही ज्ञानाची भाषा आहे आणि जागतिक स्तरावर होणाऱ्या संशोधनाचं बहुतांश साहित्य इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे इंग्रजी बाजूला सारून स्थानिक भाषांचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचं ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “विद्यमान सरकार कदाचित थेट मराठीला विरोध करणार नाही, पण नवीन शैक्षणिक धोरण पाहता हिंदी एकमेव शिक्षणभाषा म्हणून राबवण्याचा डाव आहे. हे धोरण मूलतः चुकीचं आहे.”

मोर्चा कोण काढतो यापेक्षा मराठीवर अन्याय होऊ नये हे महत्त्वाचं!

मनसे व ठाकरे गटाच्या ५ जुलैच्या मोर्चाविषयी बोलताना चव्हाण म्हणाले, “कोण कसा मोर्चा काढतो हा त्यांचा राजकीय निर्णय आहे. प्रदेशाध्यक्ष ठरवतील की काँग्रेस सहभागी होणार का. मात्र, आमची भूमिका स्पष्ट आहे. ‘मराठीवर अन्याय होऊ देता कामा नये.’”

शिक्षणात मूलभूत सुधारणांची गरज

पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते, भाषेच्या नावावर सुरू असलेला गोंधळ टाळून शिक्षणाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणं ही काळाची गरज आहे. भाषिक अस्मिता जपताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करणं सर्वप्रथम महत्त्वाचं आहे.