Sanjay Raut : महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक झाला असून २९ जून रोजी शासन निर्णयाची होळी आणि ५ जुलै रोजी भव्य मोर्चा काढणार आहे.
मुंबई: महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा विषय करण्याच्या आणि त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीला ठाकरे गटाकडून जोरदार विरोध केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काढलेल्या या निर्णयाविरोधात ठाकरे गट येत्या २९ जून रोजी शासन निर्णयाची होळी करणार आहे, तर ५ जुलै रोजी भव्य मोर्चा काढणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत याची माहिती दिली असून, मराठी माणसाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
राऊतांनी दिली आंदोलनाची सविस्तर माहिती
संजय राऊत यांनी नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये हिंदी सक्तीच्या धोरणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. २९ जून आणि ५ जुलै रोजी हे आंदोलन कशा प्रकारे केले जाईल, याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. "मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया," असे आवाहन करत राऊत यांनी मराठी भाषिकांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
उद्धव ठाकरे होळी आंदोलनात सहभागी होणार
राऊतांच्या ट्विटनुसार, २९ जून रोजी रविवारी दुपारी ३ वाजता आझाद मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या हिंदी सक्तीच्या सरकारी निर्णयाची आणि फडणवीसी आदेशाची होळी करण्याच्या आंदोलनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित राहणार आहेत. तसेच, ५ जुलै रोजीच्या मराठी एकजूट मोर्चाच्या तयारीसाठी शाखाप्रमुखांची एक बैठक २९ जून रोजी संध्याकाळी ५ वाजता शिवसेना भवन येथे होणार आहे. या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख मार्गदर्शन करतील, असेही राऊत यांनी नमूद केले आहे.
मनसे आणि ठाकरे गट एकत्र मोर्चा काढणार
संजय राऊत यांनी एक फोटो शेअर करत "हिंदी सक्तीच्या सरकारी निर्णयाची होळी करूया. मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया," असे म्हटले आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, ५ जुलै रोजी ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकत्र मोर्चा काढणार असल्याची माहितीही राऊत यांनी दिली आहे. यावरून हिंदी सक्तीविरोधात दोन्ही गट एकत्र येत आपली ताकद दाखवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


