नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी फिरायला गेलेल्या साई नावाच्या तीन मुलांचा एकाचवेळी पाण्याच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.
नाशिक : नाशिकच्या बिडी कामगार नगर रस्त्यावर मन हेलावून टाकणारी दुर्घटना समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी फिरायला गेलेल्या तीन बालमित्रांचा **बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष बाब म्हणजे मृत तिघांचं नावही "साई" हेच होतं.साई हिलाल जाधव (वय १४),साई केदारनाथ उगले (वय १४), साई गोरख गरड (वय १५) अशी मृत बालमित्रांची नावे आहेत.
नक्की काय घडले?
रविवारी सुट्टीच्या दिवशी चौघे मित्र साई गरड यांच्या गोठ्यावर गायीच्या वासरासोबत खेळण्यासाठी गेले होते. तिथून परत येताना त्यांनी गंगेवर पोहण्याचा विचार केला. दरम्यान, गरड यांच्या वडिलांनी सर्वांना "लवकर घरी जा" असा सल्ला दिला होता. घरी निघाल्यानंतर वाटेत एका बांधकाम साईटवर खोदलेल्या खड्ड्यात पोहण्याचा मोह तिघांना आवरला नाही. चौथा मित्र मात्र घरी गेला, कारण त्याच्या आईने वाट पाहण्याचे सांगितले होते. त्यामुळे फक्त तीन मित्र खड्ड्यात उतरले आणि हीच त्यांची शेवटची वेळ ठरली. खड्ड्यात पाण्याची खोली अधिक असल्याने आणि गाळात पाय अडकून तिघेही बुडाले. कोणीही त्यांच्या मदतीला पोहोचू शकले नाही.
१२ तासांच्या शोधानंतर सापडले
तिघेही रविवार दुपारपासून बेपत्ता होते. रात्री दोनच्या सुमारास त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. रात्रीभर नातेवाईकांनी त्र्यंबक, गोदाघाट, गंगापूर धरण आदी ठिकाणी शोध घेतला.सोमवारी सकाळी साईटवर तिघांचे कपडे आढळून आले. त्यानंतर अग्निशामक दल व पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. शेवटी पाण्यात गाळात रुतलेल्या अवस्थेत तिघांचे मृतदेह आढळून आले.
तिघांचे मृतदेह बाहेर काढल्यावर नातेवाईकांचा हंबरडा फुटला. पालकांनी मृतदेह कवटाळत काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश केला. एकाच वेळी तिघांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
वडिलांकडे चॉकलेट मागितल्याने पित्याकडून लेकीची हत्या
लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे माणुसकीला काळिमा फासणारी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. केवळ चॉकलेट मागितल्याच्या कारणावरून एका पित्याने आपल्या चार वर्षांच्या चिमुरडीची गळा दाबून निर्घृण हत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत मुलीचं नाव आरुषी बालाजी राठोड (वय ४) असून आरोपीचे नाव बालाजी बाबू राठोड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीला दारूचे अतिव्यसन असून तो नेहमीच पत्नी वर्षा राठोड यांना मारहाण करत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून तीन महिन्यांपूर्वी वर्षा आपल्या दोन्ही मुलांसह माहेरी गेली होती.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


