वर्धा जिल्ह्यातील निमसडा येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने काकू आणि चुलत भावाची हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

वर्धा: जमिनीच्या वादातून रक्ताचे नाते संपल्याची एक मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील निमसडा येथील शेतशिवारात आज सकाळी घडली. पुतण्याने आपल्या काकू आणि चुलत भावाची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही विषप्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

निमसडा येथील रहिवासी साधना मोहिजे (वय ५५) आणि त्यांचा मुलगा नितीन मोहिजे (वय २७) हे दोघे सकाळी आपल्या शेतात कामासाठी गेले होते. याचवेळी त्यांचा पुतण्या तथा भाऊ महेंद्र मोहिजे (वय ४५) तिथे आला. शेतजमिनीच्या जुन्या वादामुळे त्यांच्यात पुन्हा एकदा बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, महेंद्रने कुऱ्हाडीने साधना मोहिजे आणि नितीन मोहिजे यांच्यावर वार करत त्यांची हत्या केली. या दुहेरी हत्याकांडानंतर महेंद्र मोहिजेने लगेच विषप्राशन केले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलीस दलाची धावपळ

या घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर ठाण्याचे ठाणेदार विजय घुले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, पोलीस अपर अधीक्षक सागर कवडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व माहिती घेतली.

या थरारक घटनेमुळे निमसडा गाव आणि आसपासच्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्लीपूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. जमिनीच्या एका क्षुल्लक वादातून तीन लोकांचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.