जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात चुलत्याकडूनच भावाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरंतर, वाळू तस्करीबद्दल भाऊ पोलिसांना भाऊ माहिती देत असल्याचा संशय चुलत्याला आला होता. यावरुनच हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला. 

जालना : जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाला हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. कुंभार पिंपळगाव परिसरात पोलिसांना माहिती पुरवत असल्याच्या संशयातून चुलत भावानेच एका तरुणाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृत तरुणाचा मृतदेह तब्बल २९ जून रोजी विदर्भातील किनगावराजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तडेगाव टाकरखेडा परिसरात आढळून आला.

चुलत भावानेच रचला हत्येचा कट

हत्या झालेल्या तरुणाचे नाव सुरेश तुकाराम आर्दड (वय ३३) असे आहे. या प्रकरणात आरोपी हरी कल्याण तौर (चुलत भाऊ), सखाराम ऊर्फ खन्ना बप्पासाहेब आर्दड (राजाटाकळी), आणि हिनाज बावामिया सय्यद (कुंभार पिंपळगाव) अशी तिघांची नावे समोर आली आहेत. प्राथमिक तपासानुसार, सुरेश हा वाळू तस्करीबाबत पोलिसांना माहिती पुरवतो, असा आरोप करून या तिघांनी त्याचे अपहरण केले आणि त्याची हत्या केली.

पिस्तूल, कुऱ्हाडीचा धाक दाखवून अपहरण

घटनेच्या रात्री तिघांनी सुरेशला कुंभार पिंपळगाव येथे बोलावून घेतले आणि त्याला पिस्तूल व कुऱ्हाडीचा धाक दाखवत चारचाकी वाहनात जबरदस्तीने बसवून नेले. यानंतर त्याची हत्या करून मृतदेह विदर्भातील एका दूरस्थ भागात टाकण्यात आला.

२९ जूनला मृतदेहाची ओळख पटली

तडेगाव शिवारात एक मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी किनगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असता, घनसावंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अपहरण प्रकरणाशी मृतदेहाचा संबंध असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह सुरेश आर्दड याचाच असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

तपासानुसार, सुरेश हा वाळू तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांना सतत माहिती पुरवतो होता. याच रागातून चुलत भावाने आणि त्याच्या साथीदारांनी सुरेशची हत्या करण्याचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे.दरम्यान, कुंभार पिंपळगावहून अपहरणासाठी वापरले गेलेले वाहन जवसगाव परिसरात आढळून आले असून, घनसावंगी पोलीस ठाण्यात ते जमा करण्यात आले आहे. मात्र, तिन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांचा तपास पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. 

अमरावतीत पोलिसाची भर रस्त्यात निर्घृण हत्या

संपूर्ण शहर हादरवून टाकणारी एक खळबळजनक घटना अमरावतीत घडली आहे. वलगाव पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अब्दुल कलाम अब्दुल कादर यांची चारचाकीने उडवून, त्यानंतर धारदार शस्त्राने छातीवर-पोटावर सपासप वार करत हत्या करण्यात आली. भरदिवसा शहरात घडलेल्या या नृशंस हत्येमुळे पोलीस यंत्रणेसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अब्दुल कलाम अब्दुल कादर हे नेहमीप्रमाणे दुचाकीने आपल्या कर्तव्यावर निघाले होते, तेव्हा अचानक मागून आलेल्या चारचाकी गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. रस्त्यावर पडताच दोन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्या छाती आणि पोटावर सपासप वार केले आणि घटनास्थळावरून फरार झाले.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना बेस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही हत्या इतकी थरारक होती की काही क्षणांतच परिसरात भीतीचे वातावरण पसरले. दरम्यान, २० जून रोजी अब्दुल कलाम अब्दुल कादर यांचे बंधू यांचा काही लोकांशी आर्थिक वाद झाला होता. त्यावेळी एएसआय अब्दुल कलाम अब्दुल कादर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. हाच राग मनात ठेवून आरोपींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा पोलिसांचा संशय आहे.