Malegaon Sugar Ajit Pawar Chairman : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाली आहे, तर संगीताताई कोकरे व्हाईस चेअरमन झाल्या आहेत. विरोधी गटाने पवार यांच्या निवडीला बेकायदेशीर ठरवत आक्षेप घेतला आहे.

शिवनगर (ता. माळेगाव) : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली आहे, तर व्हाईस चेअरमनपदी संगीताताई कोकरे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड शनिवारी (५ जुलै) झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत झाली.

निळकंठेश्वर पॅनलचा संपूर्ण विजय

जून महिन्यात झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलने दणदणीत विजय मिळवत सत्ता काबीज केली होती. विरोधी पॅनल "सहकार बचाव शेतकरी सहकारी पॅनल" फक्त चंद्रराव तावरे यांच्या विजयापुरतं मर्यादित राहिला.

विरोधकांचा आक्षेप

निवडीनंतर विरोधी गटातील संचालक चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांची चेअरमन पदावर निवड बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, "पवार हे ‘ब वर्ग’ चे सदस्य असल्याने त्यांची चेअरमनपदी निवड नियमबाह्य आहे," असे सांगत त्यांनी संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयाचा दाखला दिला.

दुसरीकडे, रंजन तावरे यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केला की, "पवार यांनी कधीच माळेगाव कारखान्यात ऊस गाळपासाठी ऊस दिला नाही. तरीही त्यांची चेअरमनपदी निवड ही फक्त राजकीय ताकदीचा परिणाम आहे."

सत्तेचा मजबूत आधार

निळकंठेश्वर पॅनलने निवडणुकीत मिळवलेला संपूर्ण विजय पाहता अजित पवार यांची चेअरमनपदी निवड आधीच ठरलेली होती. पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल कशी राहणार, याकडे आता राज्यातील सहकारी वर्तुळाचे लक्ष लागले आहे.