Sushil Kedia Office Vandalise : ‘मी मराठी शिकणार नाही’ असे विधान केल्यानंतर सुशील केडिया यांच्या कार्यालयावर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला. यानंतर केडियांनी माफी मागितली असली तरी वाद वाढण्याची शक्यता आहे.
मुंबई : ‘मी मराठी शिकणार नाही’, असे आव्हानात्मक विधान केल्यानंतर व्यावसायिक सुशील केडिया वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी केडियांचे कार्यालय फोडल्याने राज्यात मराठी वादावरून पुन्हा एकदा राजकीय ताप वाढला आहे. वरळी येथील वीवर्क ऑफिसमध्ये झालेल्या या तोडफोडीनंतर पाच मनसे कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
घटनेची पार्श्वभूमी काय?
मुंबईतून व्यवसाय करणारे सुशील केडिया यांनी काही दिवसांपूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट करत "मी मराठी शिकणार नाही" असे स्पष्ट सांगितले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, “गेल्या ३० वर्षांपासून मी मुंबईत आहे, पण मराठी बोलत नाही. आणि राज ठाकरेंसारखे लोक जर मराठी माणसाचे कैवारी असतील, तर मी ठामपणे सांगतो की, मी मराठी शिकणार नाही!” या विधानानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. विशेषतः मराठी-अमराठी वाद आधीच तापलेला असताना, केडियांचे हे वक्तव्य मनसे कार्यकर्त्यांना चाळवणारे ठरले.
कार्यालयाची तोडफोड, कार्यकर्ते अटकेत
याच संतापातून, शनिवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी वरळीतील सेंच्युरी बाजारजवळील सुशील केडियांच्या वीवर्क ऑफिसवर हल्ला चढवला. तोडफोडीनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
माफी मागत केडियांची मागे फिरकी
विवाद विकोपाला जाताच, सुशील केडिया यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट करत क्षमायाचना केली. त्यांनी म्हटले की, "ते ट्विट मी मानसिक तणावात असताना लिहिले होते. त्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. मला वाटते मी ती पोस्ट मागे घ्यायला हवी होती." ते पुढे म्हणाले, "मराठी न येणाऱ्या लोकांवर हात उठवल्याच्या घटनेनंतर मी खूप अस्वस्थ झालो होतो. त्यातूनच ती प्रतिक्रिया आली. पण आता मला वाटते की संवाद हवा होता, संघर्ष नव्हे."
राजकीय प्रतिक्रिया अपेक्षित
राज्यात मराठी विरुद्ध हिंदी वादाचे वातावरण आधीच तापलेले असताना, या घटनेनंतर राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिक यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरून मुंबईतील सामाजिक समरसतेवर प्रश्नचिन्ह उभे केलं आहे.