नाशिकमध्ये पुढील वर्षी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. तत्पूर्वी राज्य सरकारने नाशिक-त्र्यंबकेश्वर प्राधिकर विधेयक सादर करण्यात आले आहे. या विधेयकानुसार कुंभमेळ्यावेळी खास उपाययोजना करण्याची जबाबदारी प्राधिकरणावर असणार आहे.
मुंबई : पुढील वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विधेयक’ सादर केले आहे. जून महिन्यात जारी करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक आता विधीमंडळात मांडण्यात आले आहे. कुंभमेळा दर १२ वर्षांनी होतो, आणि २०१५ मधील शेवटच्या कुंभमेळ्यात तब्बल २.५ कोटी भाविकांनी हजेरी लावली होती.
प्राधिकरणाला तात्पुरत्या शहर-विकासासाठी विशेष अधिकार
या विधेयकानुसार, प्राधिकरणाला कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या निवास, पर्यटन व अन्य गरजांसाठी तात्पुरती शहरे किंवा टाउनशिप विकसित करण्याची परवानगी देण्याचा विशेष अधिकार असेल. तसेच, अशा तात्पुरत्या शहरांमध्ये तंबू, झोपड्या, इमारती, रस्ते व आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे अधिकारही प्राधिकरणाला प्रदान करण्यात आले आहेत.
इतर विकास योजनांवर विधेयकाचा प्रभाव
विधेयकात नमूद केल्यानुसार, प्राधिकरणाने दिलेल्या परवानग्यांच्या कालावधीत, इतर कोणतीही विकास योजना, प्रादेशिक योजना, नगररचना योजना, नियम किंवा अधिसूचना लागू होणार नाही. हे अधिकार दोन वर्षांपर्यंत मर्यादित असतील.
रस्ते व वाहतुकीसाठी स्वतंत्र अधिकार
प्राधिकरणाला नव्याने विकसित होणाऱ्या टाउनशिप किंवा शहरांपर्यंत मुख्य रस्त्यांपासून रस्ते जोडणी करण्याचा स्वतंत्र अधिकार असेल. सर्व विकास प्राधिकरणाच्या निर्णयानुसार मर्यादित कालावधीतच करण्यात येणार आहे.
न्यायालयीन हस्तक्षेपावर मर्यादा
या विधेयकानुसार, कोणत्याही न्यायालयाला प्राधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध खटला दाखल करता येणार नाही. प्राधिकरणाच्या आदेशांमध्ये अडथळा आणणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात येईल. दोषी आढळल्यास एक वर्षापर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
२२ सदस्यीय प्राधिकरण व मंत्री समितीची स्थापना
प्राधिकरणाचे नेतृत्व नाशिकचे विभागीय आयुक्त करतील. एकूण २२ सदस्य असलेल्या प्राधिकरणाच्या कामकाजावर नजर ठेवण्यासाठी, अहवालांचा आढावा घेण्यासाठी व शुल्कांना मान्यता देण्यासाठी मंत्र्यांची विशेष समिती स्थापन केली जाणार आहे.
त्र्यंबकेश्वर स्थळास ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर स्थळास अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत दिली आहे. याशिवाय आगामी कुंभमेळाच्या दृष्टीने त्र्यंबक नगरीच्या एकूणच सर्वांगिण विकासाला चालना मिळेल असेही ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


