राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रांतर्गत घेतलेले वादग्रस्त निर्णय मागे घेतल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) 5 जुलै रोजी 'मराठीचा विजयी मेळावा' आयोजित करणार आहे. उद्धव ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

मुंबई : राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रांतर्गत घेतलेले दोन्ही वादग्रस्त निर्णय मागे घेतल्यानंतर आता शिवसेना (ठाकरे गट) ने मोठी घोषणा केली आहे. 5 जुलै रोजी ‘मराठीचा विजयी मेळावा’ आयोजित केला जाणार असून, उद्धव ठाकरे स्वतः या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेने यासंदर्भात अधिकृत सोशल मीडिया पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. "ठरलं… पाच जुलै, मराठीचा विजयी मेळावा! ठाकरे येत आहेत…"

हिंदी सक्ती रद्द, पण आंदोलनाची जिद्द कायम

गेल्या काही आठवड्यांपासून राज्यात पहिलीपासून हिंदी सक्तीच्या विरोधात वातावरण तापले होते. विविध मराठी संघटनांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सुरुवात केल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) ने देखील आक्रमक भूमिका घेतली.

या आंदोलनाचा परिपाक म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही संबंधित शासन निर्णय (जीआर) मागे घेतल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित होते.

मोर्चा रद्द, पण 'विजयी मेळावा' ठरला!

5 जुलै रोजी ठाकरे बंधूंनी (उद्धव आणि राज ठाकरे) एकत्र मोर्चा काढण्याचं ठरवलं होतं. मात्र जीआर मागे घेतल्यानंतर, हा मोर्चा रद्द करण्यात आला. खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी "लढा जिंकला, पण उत्सव व्हायलाच हवा," अशी भूमिका मांडत मेळाव्याची शक्यता सूचित केली होती.आता ही शक्यता वास्तवात उतरली आहे आणि मेळाव्याची अधिकृत घोषणा झाली आहे.

5 जुलैचा मेळावा, केवळ विजयाचा नव्हे तर पुढच्या लढ्याची तयारी!

हा मेळावा केवळ निर्णय मागे घेण्यात आल्याचा विजय साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, मराठी अस्मितेसाठीच्या लढ्याचं पुढचं रूप असेल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर 5 जुलैचा मेळावा महाराष्ट्राच्या भाषिक आणि सांस्कृतिक राजकारणात महत्त्वपूर्ण टप्पा ठरू शकतो.