पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात आज आरोपी चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर नेले जाणार आहे. या ठिकाणी नेऊन 'क्राइम सीन रिक्रिएशन' आणि फॉरेन्सिक गेट अॅनालिसिस करण्यात येणार आहे.
Ketan Agrawal Case : पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरण राज्यात चांगलेच तापले आहे. या प्रकरणात दिवसेंदिवस नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. अशातच आज पुणे पोलिसांकडून आरोपी चेतन चौधरीला लोहगडावर नेण्यात येणार आहे. येथे क्राइस सीन रिक्रिएशन (Crime Scene Reconstruction) आणि फॉरेन्सिक गेट अॅनालिसिस (Gait Analysis) करणार आहेत. या प्रक्रियेमुळे तपासातील महत्त्वाचे पुरावे आणि घटनाक्रम अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याआधी सिया गोयलला लोहगडावर नेण्यात आले असून तेथे क्राइम सीन रिक्रिएशन करण्यात आले होते.

लोहगड किल्ल्यावर 'क्राइम सीन रिक्रिएशन' आणि गेट अॅनालिसिस
पोलिसांकडून आज चेतन चौधरीला लोहगड किल्ल्यावर नेऊन घटनास्थळी क्राइम सीन रिक्रिएशन केले जाणार आहे. यासोबतच गेट अॅनालिसिसद्वारे चालण्याच्या आणि धावण्याच्या पद्धतीचा फॉरेन्सिक अभ्यास केला जाणार आहे. सीसीटीव्ही किंवा व्हिडिओ फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती आणि आरोपीची चालण्याची पद्धत यांची तुलना करून तपासातील महत्त्वाचे धागेदोरे मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
सिया गोयलनंतर आता चेतन चौधरीची तपास प्रक्रिया
या प्रकरणात यापूर्वी मुख्य आरोपी सिया गोयलसोबत घटनास्थळी क्राइम सीन रिक्रिएशन करण्यात आले होते. मात्र चेतन चौधरीबाबत ही प्रक्रिया अद्याप बाकी होती. त्यामुळे आज त्याला घटनास्थळी नेऊन संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तपासादरम्यान लोहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या ठिकाणच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
18 जूनला घडली होती घटना
18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरून पडून केतन अग्रवाल यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांना अटक केली. पोलिसांच्या तपासानुसार, केतनशी साखरपुडा झालेल्या सिया गोयलला तत्काळ विवाह करायचा नव्हता. पण कौटुंबिक दबावामुळे हा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
या प्रकरणात वडगाव मावळ न्यायालयाने सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पीडिताच्या कुटुंबीयांच्या मागणीनंतर राज्य सरकारने या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पीडित कुटुंबाला जलद आणि कठोर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.


