केतन अग्रवालच्या मृत्यूप्रकरणी पुणो पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. अशात पोलिसांनी रविवारी महत्त्वाचं पाऊल उचलत सियाला लोहगडावर नेत केतनच्या हत्येचा सीन रिक्रिएट केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.
पुणे : पुण्यातील केतन अग्रवालची लोहगड किल्ल्यावरुन ढकलून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. केतनचे मारेकरी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांची २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. केतनच्या हत्येप्रकरणी सिया गोयल, चेतन चौधरी यांच्या चौकशीनंतर सियाचा भाऊ साहिल चौधरी, सियाचे आई-वडील यांचीही चौकशी करण्यात आली. आता पुणे पोलिसांनी या हत्येप्रकरणी महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. रविवारी २८ जून रोजी पोलिसांनी सियाला लोहगडावर नेलं. तिने लोहगडावरील ज्या ठिकाणाहून केतनला ढकलत त्याची हत्या केली, त्याच ठिकाणी पोलिसांनी केतनला ढकलल्याचा क्राईम सीन रिक्रिएट केला आहे. या संपूर्ण सीन रिक्रिएट वेळी सियाला मोठ्या पोलीस बंदोबस्तात लोहगडावर आणण्यात आलं होतं.

सकाळी ८ वाजता सियाला लोहगडावर नेण्यात आलं. तिथे पोलिसांनी डमी पुतळा आणला होता. केतनला सियाने कशाप्रकारे लोहगडावरुन दरीत ढकललं याचा घटनाक्रम डमी पुतळ्याच्या मदतीने उलगडत पोलिसांनी बारकाईने माहिती घेतली. सकाळी ८ वाजल्यापासून ते १०.३० वाजेपर्यंत पोलीस पथक घटनास्थळाची माहिती घेत होते. केतनच्या हत्येचा सीन रिक्रिएट करताना गुप्तता पाळण्यात आली होती. प्रकरणाचा तपास सुरू असताना लोहगड पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या काळात कोणालाही किल्ल्यावर प्रवेश देण्यात आला नाही. या हत्येच्या सीन रिक्रिएशनची पलिसांना पुढील तपासात मदत होणार आहे.
दरम्यान, केतनशी लग्न करायचं नव्हतं, तर सियाकडे लग्नाला नकार देण्याचा सोपा मार्ग होता, पण तिने केतनची हत्या केली. लग्न मोडण्यापेक्षा केतनची हत्या करणं अधिक सोयीचं, सोपं वाटल असल्याचा कबुली जबाब सियाने पोलीस चौकशीत दिला आहे. लग्न मोडलं तर कुटुंबाची प्रतिष्ठा कमी होण्याची भीती असल्याने तिने लग्न न मोडलता केतनला संपवण्याचा प्लॅन केला. आपला हा बनाव कोणच्याही लक्षात येणार नाही असं तिला वाटत होतं. पण तिचा हा प्लॅन फसला आणि भयंकर घटना समोर आली.


