Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. यामुळे हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. अशातच नागरिकांनी आवश्यक असल्यास घराबाहेर पडावे असा सल्लाही देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात मान्सूनने जोर धरला आहे. अशातच पुढील काही तास आणि दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर कोकण, मुंबई महानगर प्रदेशासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मुंबई, ठाणे, रायगडसह कोकणाला ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथील काही ठिकाणी वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. तसेच पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतही हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. तर बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव आणि लातूर येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

विदर्भात अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत मान्सूनच्या आगमनासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सखल भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, अनावश्यक प्रवास टाळावा. तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे. पावसाच्या काळात विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.