Hinjewadi to Mumbai direct bus service: एसटी महामंडळ पुण्यातील हिंजवडी आयटी हबमधून मुंबईसाठी थेट बस सेवा सुरू करणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना शहरातील वाहतूक कोंडी टाळून थेट महामार्गाने प्रवास करता येईल.  

पुणे : पुण्यातील आयटी हब असलेल्या हिंजवडीत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी एक सुखद बातमी आहे. पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करताना आता वाहतूक कोंडीचा अडथळा दूर होणार आहे. प्रवाशांची वर्षानुवर्षांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने हिंजवडी ते मुंबई थेट बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन प्रयोगामुळे प्रवाशांचा किमान ६० ते ९० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

वाकडचा ट्रॅफिक जॅम आता 'बाय-बाय'!

सध्या मुंबईला जाणाऱ्या शिवनेरी आणि शिवाई बसेसना स्वारगेट किंवा पुणे स्टेशनवरून वाकड हायवेपर्यंत येण्यासाठी शहरातील गर्दीतून वाट काढावी लागते. यात प्रवाशांचे दीड ते दोन तास वाया जातात.

नवा मार्ग: हिंजवडीतून बस सुटल्यामुळे ती थेट महामार्गाला लागेल.

फायदा: प्रवाशांना आता स्वारगेटला जाण्याची कसरत करावी लागणार नाही, पर्यायाने शहरातील अंतर्गत ट्रॅफिकमधून सुटका होईल.

प्रवासाचा 'स्मार्ट' अनुभव, काय आहेत खास सोयी?

१. थेट कनेक्टिव्हिटी: आयटी कर्मचाऱ्यांना ऑफिस किंवा घरापासून थेट मुंबईसाठी (दादर, बोरीवली, ठाणे) बस मिळेल.

२. मेट्रोचा मेळ: आगामी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ मुळे प्रवाशांना या बस स्थानकापर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल.

३. इको-फ्रेंडली प्रवास: हिंजवडीत खास चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असून, याद्वारे ई-शिवनेरी आणि ई-शिवाई बसेसना प्राधान्य दिले जाईल.

प्रशासकीय हालचालींना वेग

पुणे विभागाचे नियंत्रक अरुण सिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेवेचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठवण्यात आला असून पुढील काही महिन्यांतच ही सेवा सुरू होईल. सुरुवातीला हिंजवडी ते दादर, बोरीवली आणि ठाणे या मार्गांवर सर्वाधिक फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे.

आता मुंबई गाठणे अधिक सोपे, जलद आणि आरामदायी होणार आहे. पुण्यातील 'ट्रॅफिक'चा ताण आता मुंबईच्या प्रवासात जाणवणार नाही!