बीडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या समर्थकाकडून एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना
बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातून समोर आलेली एक धक्कादायक घटना संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी ठरली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुन्हेगार असलेला वाल्मीक कराड तुरुंगात असला, तरी त्याच्या समर्थकांकडून गुन्हेगारी कृत्ये सुरूच असल्याचे चित्र समोर येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
बुधवारी, वाल्मीक कराडच्या निकटवर्तीय समर्थक नानासाहेब चौरे याने एका गतीमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणी आपल्या नातेवाईक महिलेसोबत आरोग्य उपकेंद्रात गेली होती. यावेळी तिची नातेवाईक महिला काही वेळासाठी रुग्णालयात गेली असताना पीडित तरुणी केंद्राबाहेर थांबली होती. याच संधीचा फायदा घेत नानासाहेब चौरेने तरुणीला आडबाजूला नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. ही घटना समोर आल्यानंतर केज पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
आरोपी कोण आहे?
नानासाहेब चौरे हा वाल्मीक कराडचा कट्टर समर्थक मानला जातो. काही महिन्यांपूर्वी त्याने कराड याच्यावरचे सर्व गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले होते. त्यावेळी गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी समजूत घालून त्याला खाली उतरवले होते.आज मात्र, त्याच नानासाहेब चौरेने गतीमंद तरुणीवर अत्याचार केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.
संताप आणि चिंता
या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात भीती आणि रोषाचे वातावरण पसरले आहे. गतीमंद आणि असहाय तरुणींवर असे अत्याचार होत असणे ही समाजाच्या असंवेदनशीलतेची लक्षणं मानली जात आहेत. वाल्मीक कराडच्या टोळीचा प्रभाव आणि त्याच्या समर्थकांचे निर्ढावलेपण पुन्हा एकदा उघड झाले असून, स्थानिक नागरिकांनी पोलिसांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.

