पुण्यामध्ये एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून घुसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे या कृत्यानंतर व्यक्तीने एक नोट लिहित त्यात खास मेसेज लिहिला आहे.
पुणे : पुण्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कोंढवा भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बुधवारी सायंकाळी घडलेली धक्कादायक घटना शहराच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
एका 25 वर्षीय तरुणीवर कुरिअर बॉय असल्याचे भासवत एका अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, ही घटना घडत असताना पीडिता घरात एकटी होती.
बुधवारी संध्याकाळी साधारणतः 7.30 वाजता, आरोपीने “कुरिअर आहे” असे सांगून सोसायटीत प्रवेश केला. पीडित महिलेने "कुरिअर माझं नाही" असे स्पष्ट सांगितल्यानंतरही आरोपीने "सही तर करावीच लागेल" असा आग्रह धरला. त्यानंतर महिलेने सेफ्टी डोअर उघडताच आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे फवारला, तिला बेशुद्ध केले आणि तिच्यावर अत्याचार केला.घटना घडून गेल्यानंतर आरोपीने पीडितेचा मोबाईल उचलून त्यात स्वतःचा सेल्फी काढला आणि “मी परत येईन” असा थरकाप उडवणारा मेसेज ठेवला.
सध्या पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. या घटनेनंतर कोंढवा परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून होत आहे.
स्वारगेट एसटी स्थानकावर काही दिवसांपूर्वीच घडलेल्या बलात्काराच्या घटनेची चर्चा अद्याप सुरु असतानाच, या नव्या प्रकरणामुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अधिक गंभीर झाला आहे.
पुण्यातील भोंदू बाबाचा पर्दाफाश
पुण्यातील बावधन परिसरातून अटक झालेल्या प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार या भोंदू बाबाने भक्तांच्या श्रद्धेचा कसा विकृत फायदा घेतला, हे समोर येणाऱ्या तपशीलांतून स्पष्ट होत आहे. मोबाईलमध्ये हिडन अॅप डाऊनलोड करून भक्तांवर नजर ठेवणे, समलैंगिक संबंध, आंघोळ घालण्याचे निमित्त करून शारीरिक शोषण, आणि अघोरी क्रियांचा बनाव करत भक्तांच्या भावनांची आणि शारीरिक संबंध असे प्रकार करायचा. या प्रकरणातील बाबाला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
महिला भक्तांसोबत नाच
प्रसाद बाबाचे महिलांसोबत नाचतानाचे, त्यांच्याशी संवाद साधतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. इन्स्टाग्रामवर त्याचे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. अनेक महिला आणि पुरुष भक्त त्याच्या मठात नियमित येत असत. पण विश्वास संपादन करून तो पुरुष भक्तांचे अंग चोळणे, त्यांना अंघोळ घालणे, इथपासून सुरुवात करायचा.