
Marathi for Taxi Driver मराठी न बोलणारे टॅक्सी ड्रायव्हर्स आरटीओकडून शोध सुरु, 1 महिन्याची नोटीस
महाराष्ट्रातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आले आहे. मराठी न येणाऱ्या चालकांसाठी राज्य सरकारने मे महिन्यापासून मोफत मराठी भाषा प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. मात्र, अद्याप 60 टक्क्यांहून अधिक चालकांनी या वर्गांना हजेरी लावलेली नसल्याचे सांगण्यात आले.आता मराठी न शिकलेल्या चालकांना नोटीस देऊन सरकारने निश्चित केलेल्या केंद्रांवर एका महिन्याच्या आत मराठी शिकण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतरही मराठी न शिकल्यास चालकांचा परवाना निलंबित केला जाईल आणि तीन महिन्यांनंतरही नियमांचे पालन न केल्यास परवाना रद्द करण्याची कारवाई होईल.प्रवासी आणि चालकांमध्ये संवाद व्यवस्थित व्हावा आणि व्यवहारात गैरसमज निर्माण होऊ नयेत, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ही दंडात्मक कारवाई नसून महाराष्ट्र मोटार वाहन नियमांनुसार असलेली आवश्यकता आहे. चालकांसाठी मराठीचे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असल्याचेही सांगण्यात आले.