राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी वयाच्या 75 व्या वर्षी निवृत्त व्हावे या विधानावरुन राजकरण तापले आहे. याच विधानावरुन आधी संजय राऊत आणि नंतर राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकतेच वयाच्या 75 वर्षांनंतर निवृत्त व्हावे, असा संकेत देणारे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वादाला तोंड फुटले आहे. त्यांनी दिवंगत संघनेते मोरोपंत पिंगळे यांचे उद्गार उद्धृत करताना म्हटले की, "75 वर्षांची शाल पांघरली म्हणजे थोडे बाजूला व्हावे," यावरून अनेकांनी याचा संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वयानं जोडला. मोदी आणि भागवत दोघेही सप्टेंबर 2025 मध्ये 75 वर्षांचे होणार आहेत.
यावरून विरोधकांनी भाजपला लक्ष्य करत म्हटले की, आता मोदींनी संधी दुसऱ्यांना द्यावी. मात्र, संघवर्तुळातून स्पष्टीकरण देण्यात आले की, भागवत यांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ लावणं चुकीचं आहे आणि त्यांच्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. यासोबतच भाजपनेही स्पष्ट केले की, पक्षाच्या घटनेत 75 व्या वर्षी निवृत्तीची कोणतीही अट नाही.
भाजपच्या घटनेत काय आहे?
भाजपमध्ये 75 वर्षांनंतर निवृत्तीची अनिवार्यता असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. 2014 मध्ये अमित शहा भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी वरिष्ठ नेत्यांसाठी मार्गदर्शक मंडळ स्थापन केलं, ज्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, एल. के. अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना समाविष्ट केलं. त्यानंतर संसदीय मंडळातून काही ज्येष्ठ नेत्यांची वगळणी झाली. या निर्णयामुळे मार्गदर्शक मंडळाला "निवृत्तांचे मंडळ" मानले गेले.
2016 नंतर भाजपने 75 वर्षांवरील नेत्यांना उमेदवारी न देण्याचा अलिखित नियम पाळण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर तत्कालीन लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन, मुरली मनोहर जोशी यांसारख्या नेत्यांना निवडणुकीत संधी देण्यात आली नाही. मात्र, बी.एस. येडियुरप्पा, कॅप्टन अमरिंदर सिंग, ई. श्रीधरन यांसारखे काही अपवादही पाहायला मिळाले.
काँग्रेसची उपरोधिक टीका
मोहन भागवत यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने त्याचा राजकीय अर्थ लावून नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी म्हटले, "भागवतांनी एक चांगली बातमी दिली. ते म्हणाले, 75 वर्षांनंतर दुसऱ्याला संधी दिली पाहिजे. त्यामुळे 17 सप्टेंबरला देशाला मोदींपासून मुक्ती मिळेल."
काँग्रेसने दावा केला की, "भागवत यांच्या वक्तव्यानुसार मोदी आणि भागवत स्वतः बाजूला होणार असल्याने हे भारतासाठी चांगले लक्षण आहे." मात्र, संघाकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले की, हे विधान सार्वत्रिक आणि तत्वज्ञानात्मक होते, त्याचा मोदी यांच्याशी थेट संबंध जोडू नये.


