राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावर आधारित पुस्ताकाचे प्रकाशन आज झाले. यावेळी मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. 

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ प्रचारक मोरोपंत पिंगळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘मोरोपंत पिंगळे : द हिंदू आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्चर’ या पुस्तकाचं प्रकाशन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी केलेल्या “पंचहात्तरीची शाल पडली की थांबावं” या विधानामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेची लाट उसळली आहे.

मोहन भागवत यांचं खास विधान

प्रसंगी बोलताना भागवत म्हणाले, “मोरोपंत एकदा म्हणाले होते, पंचहात्तरीची शाल अंगावर पडली की तिचा अर्थ असा की आता थांबावं, तुमचं वय झालं आहे. बाजूला व्हा आणि दुसऱ्यांना काम करू द्या.” या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. संघाच्या अंतर्गत प्रक्रियेत नेतृत्व बदल, जबाबदाऱ्यांची पिढीगत अदलाबदल अशा घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचं ठरतं.

मोरोपंत पिंगळेंच्या आठवणींना उजाळा

मोहन भागवत यांनी मोरोपंतांच्या विनोदी स्वभावाची आठवण सांगितली. ते म्हणाले,“त्यांची शरीरयष्टी इतकी भव्य होती की घरात पाहुणे आले की मुलं विचारायची कोण आलं? पण मी आलो की विचारायची, आई हे काय आलं?” बाल स्वयंसेवकांसाठी ते आधारस्तंभ होते. त्यांचा स्वभावही हलकाफुलका होता. त्यांनी रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी संयम, नम्रता आणि संघनिष्ठेचं दर्शन घडवलं**, असं भागवत यांनी सांगितलं.

“मी केलं” असं कधी न म्हणणारे मोरोपंत

मोहन भागवत पुढे म्हणाले,“रामजन्मभूमी आंदोलनाच्या वेळी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही आर्किटेक्ट आहात का? तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सांगितलं, ‘ते अशोक सिंघल यांना विचारा.’ मी केलं असं त्यांनी कधीच सांगितलं नाही. त्यांनी जे काही केलं ते सगळं समर्पणातून आणि राष्ट्रभावनेतून केलं."

भागवतांच्या विधानावरून संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला?

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या निवृत्तीबाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. भागवत यांनी अलीकडेच “पंचाहत्तरीची शाल अंगावर पडली की थांबावं” असे विधान केल्याचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. 

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, “आता सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी ७५ वर्षांचे होणार आहेत. त्यांच्या दाढीचा रंगही बदललाय, डोक्यावरचे केसही उडाले आहेत. जगभर हिंडून झाले, सत्तेची सर्व सुखं उपभोगली आहेत. आता निवृत्तीचा नियम तुम्हालाही लागू करायला हवा. संघ त्यांना वारंवार सूचना देत आहे की आता तुम्ही बाजूला व्हा. देश तुमच्या हाती सुरक्षित आहे असं समजून, ते दुसऱ्यांच्या हाती सोपवण्याची वेळ आली आहे.”